सदनिका नूतनीकरणामुळे दाम्पत्याचा जीव टांगणीला; छताचे प्लास्टर कोसळून गेले तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:50 IST2020-10-10T23:50:11+5:302020-10-10T23:50:22+5:30
न्यू बलदेव इमारत ४० वर्षे जुनी असून नगरपालिकाकाळात इमारतीस वापर परवाना दिला आहे. इमारतीच्या ए-२०१ मध्ये जगानी कुटुंब राहते.

सदनिका नूतनीकरणामुळे दाम्पत्याचा जीव टांगणीला; छताचे प्लास्टर कोसळून गेले तडे
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर पश्चिमेच्या विनायकनगरमधील ४० वर्षे जुन्या इमारतीतील एका सदनिकाधारकास दुरुस्तीची परवानगी दिल्याने खालच्या सदनिकेत राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्यासह कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला आहे. तोडकामामुळे खालच्या सदनिकेतील छताचे प्लास्टर कोसळून भिंतींना तडे गेले आहेत.
न्यू बलदेव इमारत ४० वर्षे जुनी असून नगरपालिकाकाळात इमारतीस वापर परवाना दिला आहे. इमारतीच्या ए-२०१ मध्ये जगानी कुटुंब राहते. तर, त्यांच्या खालच्या सदनिकेत रंजन पांडे ही वृद्ध महिला पती, मुलगी व नातवासह राहते. जगानी यांनी नूतनीकरणाच्या कामासाठी तोडफोड केल्याने पांडे यांच्या छताचे प्लास्टर कोसळायला लागले. याबाबत पांडे यांची मुलगी हेमा यांनी १९ सप्टेंबर रोजी महापालिकेसह संबंधितांना तक्रारअर्ज केला. जीव मुठीत धरून पांडे कुटुंब राहत असताना त्यांच्या तक्रारअर्जावर कार्यवाही तर दूरच, पण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी २५ सप्टेंबर रोजी जगानी यांना दुरुस्तीची परवानगी दिली. हेमा यांनी पुन्हा पालिकेत जाऊन वस्तुस्थिती मांडल्यानंतर २८ सप्टेंबरला खांबित यांनी आधी दिलेली परवानगी रद्द केली. परंतु, १ आॅक्टोबरला पुन्हा परवानगी दिली. त्यासाठी अभियंता प्रशांत नरवणकर यांच्या अहवालाचा हवाला दिला. तो संगनमताने केल्याचा आरोप पांडे कुटुंबीयांनी केला आहे.
...तरच परवानगी रद्द करू - खांबित
गृहनिर्माण संस्थेवर प्रशासक असतानाही त्याची परवानगी घेतलेली नाही. आम्ही पतीपत्नी आजारी असतो. वयोवृद्ध आणि कुटुंब जीव धोक्यात घालून जगत असताना पालिकेला मात्र त्याचे काही सोयरसुतक नसल्याचे रंजन पांडे म्हणाल्या. काम बंद करून सर्वांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हेमा यांनी केली आहे. दीपक खांबित म्हणाले की, वरिष्ठांनी आदेश दिले तरच परवनगी रद्द करू.