Coronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 17:48 IST2020-05-29T17:47:54+5:302020-05-29T17:48:53+5:30
लॉकडाऊनच्या काळात खासदारांनी केली मदत

Coronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार
कल्याण-कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने कोरोनाची लागण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण आणि वैद्यकीय स्टाफ यांचे प्रमाण व्यस्त आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी डोंबिवलीतील तरुण प्रतिक तिरोडकर याने कोविड रोबोट तयार केला आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीत रोबोट तयार करण्यासाठी लागणारी तांत्रिक साधनसामग्री कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे शिंदे यांनी उपलब्ध करुन दिली. हा रोबोट कल्याण डोंबिवली महापालिकेस सूपूर्द करण्यात आला. तो महापालिकेच्या कोविड रुग्णालयात कार्यान्वित केला जाणार आहे.
तिरोडकर हे डोंबिवली पूर्वेतील सुनिल नगरात राहतात. त्यांनी नवी मुंबईतील भारती विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. रोबोट तयार करण्यात त्यांचे खास प्राविण्य आहे. यापूर्वी त्यांनी अनेक रोबोट तयार केले आहेत. मात्र कोरोनाच्या काळात रुग्णाचा संपर्क टाळण्यासाठी खास करुन कोविड रोबोट तयार करण्याचे काम सुरु केले. ही बाब खासदार शिंदे यांना कळताच त्यांनी त्यांना मदत केली. भारतात जपान व चीनवरुन रोबोट आयात केले जातात. तिरोडकर यांनी भारतीय बनावटीचा कोविड रोबोट तयार केला आहे.
चीनमध्ये तयार करण्यात आलेल्या रोबोटची किंमत चार ते पाच लाख रुपये असते. भारतीय बनावटीचा रोबोट दीड ते दोन लाख रुपये किंमतीत तयार करता येऊ शकतो. कोविड रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या सेवेत हा रोबोट काम करु शकतो. एकाच वेळी या रोबोटच्या माध्यमातून 10 ते 15 रुग्णांना गरम पाणी देता येऊ शकते. सॅनिटाईज करण्याचे, जेवण देण्याचे कामदेखील हा बहुआयामी रोबोट करतो. त्यामुळे पॅरामेडीकल स्टाफला रुग्णांच्या संपर्कात न जाता रोबोटच्या माध्यमातून सेवा देणे शक्य होईल असा दावा तिरोडकर यांनी केला आहे. या रोबोटचे प्रात्याक्षिक खासदार शिंदे यांच्यासह आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हा रोबोट महापालिकेच्या रुग्णालयास डोनेट करण्यात आला आहे.
याप्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यावर मात करण्यासाठी हा कोविड रोबोट चांगला उपाय ठरणार आहे. मनुष्यबळाची बचत या रोबोटमुळे होऊ शकते. तसेच कोरोनाची लागणही टाळता येऊ शकते. आज रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आहे. हा विळखा सोडविण्यास या रोबोटची मदत होऊ शकते. त्यामुळे कोरोनावर मात करणे शक्य होऊ शकते.