CoronaVirus News: पाच बेड राखीव ठेवण्याचे आदेश कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 01:50 IST2020-06-20T01:50:33+5:302020-06-20T01:50:46+5:30
रिपोर्ट न मिळालेल्या रुग्णांची हेळसांड केली जात असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त

CoronaVirus News: पाच बेड राखीव ठेवण्याचे आदेश कागदावर
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत संशयित रुग्णांचे रिपोर्ट येण्यास दोन दिवस लागतात. रिपोर्ट प्राप्त न झालेल्या रुग्णांमध्ये आजार बळावला तर उपचार करण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांत किमान पाच बेड राखीव ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र अनेक रुग्णालयांकडून हे आदेश धाब्यावर बसवण्यात आले असून रुग्णांना दाखल करण्यास नकार दिला जात असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रिपोर्ट न मिळालेल्या रुग्णांची हेळसांड केली जात असल्याने प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या रुग्णाला ताप आला तरी त्याची माहिती खाजगी रुग्णालयांनी महापालिकेस तातडीने देणे बंधनकारक आहे. सौम्य लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांचा चाचणी अहवाल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत खाजगी रुग्णालयांनी उपचार करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक यापूर्वीच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काढले आहेत. रिपोर्ट प्राप्त न झालेल्या रुग्णांकरिता प्रत्येक खाजगी रुग्णालयाने पाच बेड आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. हे बेड आयसोलेशनमध्ये असण्याची सक्ती केली आहे. रुग्णालये या आदेशाकडे डोळेझाक करतात. नांदिवली परिसरातील एका रिक्षाचालकाला सरकारी व खाजगी रुग्णालयात बेड मिळणे मुश्किल झाले होते. शुक्रवारी महापालिका हद्दीत बेड न मिळाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीत गुरुवारपर्यंत चाचणी अहवाल न आलेले ४४२ व्यक्ती होत्या.
रिपोर्टच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांवर उपचार केले जात नाहीत, अशा एकदोन तक्रारी करणारे फोनकॉल्स दररोज प्राप्त होतात. मात्र, एकाही रुग्णालयावर अद्याप कारवाई केलेली नाही.
- डॉ. प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी, कल्याण-डोंबिवली महापालिका