CoronaVirus News: जोडप्यावर टाकल्या ऑनलाइन अक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 01:46 IST2020-06-15T01:44:40+5:302020-06-15T01:46:28+5:30
मोबाइलवर कुटुंबियांनी पाहिला संपूर्ण विवाह सोहळा

CoronaVirus News: जोडप्यावर टाकल्या ऑनलाइन अक्षता
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : सोलापूर येथे रविवारी झालेल्या विवाह सोहळ्यात लॉकडाऊनमुळे उपस्थित राहू न शकलेल्या ठाण्यातील कुटुंबाने व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून त्यांच्यावर अक्षता टाकल्या. नवविवाहित जोडप्यास त्यांनी शुभाशीर्वादही दिले. हे कुटुंब मास्क घालून आणि फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून स्वत:च्या घरात उभे होते. मोबाइलवर त्यांनी संपूर्ण विवाह सोहळा पाहिला.
ठाणे पूर्व येथील कोपरी कॉलनीतील पीडब्ल्यूडी चाळीत राहणारे मनेश सूत्रावे यांचा सोलापूर येथील मावस भाऊ विशाल केकडे याचा साताऱ्याची श्रद्धा जवंजाळ हिच्यासोबत रविवारी दुपारी सोलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी विवाह सोहळा योजिला होता. याआधी एप्रिल महिन्यात या दोघांचा विवाह ठरविण्यात आला होता. लग्नपत्रिकादेखील छापायला गेल्या होत्या. परंतु, लॉकडाऊनमुळे विवाह सोहळा रद्द करावा लागला. त्यानंतर वधूवराच्या कुटुंबांनी १४ जून ही तारीख ठरवली. डिजिटल पत्रिका तयार करून ती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोजक्याच नातेवाइकांना पाठविण्यात आली. हा सोहळा त्यांनी कमी नातेवाइकांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविले. विवाह सोहळ्यात उपस्थितांना मास्कवाटप करण्यात आले, तसेच सॅनिटायझरचीही सोय केली.