CoronaVirus News: कोरोना रुग्णांवरील उपचाराबाबत हलगर्जीपणा नको - अस्लम शेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 17:36 IST2020-06-06T17:36:04+5:302020-06-06T17:36:28+5:30
CoronaVirus : या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींसह जिल्ह्यातील मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

CoronaVirus News: कोरोना रुग्णांवरील उपचाराबाबत हलगर्जीपणा नको - अस्लम शेख
ठाणे : कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांवरील उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कोरोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भीती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे, असे मत्स्यविकासमंत्री अस्लम शेख यांनी येथील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकार्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींसह जिल्ह्यातील मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शेख यांनी जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती व त्यांवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. कोरोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भीती आहे. ही भीती दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जनतेचे प्रबोधन करा, अशा सूचना शेख यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या डँशबोर्डच्या माध्यमातून सर्व जनतेला उपलब्ध करून द्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे प्राप्त तक्रारीचे निराकरण करून नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर देण्यात यावा. कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
सोशल मीडियातून चांगल्या बाबींची माहिती लोकांना द्या, असेही ते म्हणाले. एखादी व्यक्ती परदेशातून आल्यानंतर त्यासाठी आयसोलेशन व क्वारंटाईन कक्ष तयार ठेवा. नव्याने ऊभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना शेख यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या संबंधित सर्व उपाययोजनांची माहिती दिली.