CoronaVirus News: Doctors prioritize duty despite stress; Special emphasis on protein rich diet | CoronaVirus News: ताण आला तरी डॉक्टरांकडून कर्तव्याला पहिले प्राधान्य; प्रोटीनयुक्त आहारावर विशेष भर

CoronaVirus News: ताण आला तरी डॉक्टरांकडून कर्तव्याला पहिले प्राधान्य; प्रोटीनयुक्त आहारावर विशेष भर

- प्रशांत माने 

कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावात गेले पाच महिने डॉक्टर आणि परिचारिका अहोरात्र कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखाली उपचार केले जात असले, तरी डॉक्टरांची अपुरी संख्या पाहता केडीएमसीची सर्व भिस्त शहरातील खाजगी डॉक्टरांवर असल्याचेही दिसून येते. अहोरात्र आळीपाळीने सेवा बजावणाºया या सर्व डॉक्टरांना रुग्णांबरोबरच स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी लागत आहे. रुग्णसेवा करताना प्रोटीनयुक्त आहार सेवन करण्यावर विशेष भर दिला जात आहे.

महापालिका क्षेत्रात २५ कोविड रुग्णालये आहेत. ही सर्व रुग्णालये केडीएमसीच्या नियंत्रणाखाली आहेत. महापालिकेकडे स्वत:चे ४५ ते ५० डॉक्टर आहेत. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आणि अपुरा कर्मचारीवर्ग यामुळे सध्या कोरोनाच्या काळात महापालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय, कोविड सेंटर तसेच तापाच्या दवाखान्यांमध्ये तेथील डॉक्टरांबरोबरच इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), डॉक्टर आर्मीच्या तसेच वन रूपी क्लिनिकच्या माध्यमातून खाजगी डॉक्टर सेवा देत आहेत.

आयएमए डोंबिवली संस्थेचे तब्बल ४०० डॉक्टर कोरोनाबाधित रुग्णांची विविध कोविड रुग्णालयांमध्ये सेवा करीत आहेत. अविरतपणे ही सेवा सुरू असून उपचार करताना आतापर्यंत २५ ते ३० डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली असून यातील दोन डॉक्टरांचा मृत्यूही झाला आहे. तर, कल्याण आर्मीचे १९० डॉक्टर महापालिकेच्या तापाच्या आठ दवाखान्यांमध्ये, तर कोविड रुग्णालय नसलेल्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवा बजावत आहेत. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांना होत असलेली बाधा पाहता त्यांना रुग्णांच्या उपचाराबरोबरच स्वत:च्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागत आहे. प्रोटीनयुक्त आहार सेवन करण्यावर त्यांचा विशेष भर असतो. आठवड्यातून एक दिवस विश्रांती दिली जाते. जर एखाद्या डॉक्टरला बाधा झाली, तर उपचारांबरोबरच १० दिवस सक्त विश्रांती दिली जाते. सेवा बजावणाºया डॉक्टरांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांची अ‍ॅण्टीजेन चाचणीही केली जाते. डॉक्टरांबरोबरच काम करणाºया परिचारिका तसेच वॉर्डबॉय यांच्याही आरोग्याची काळजी घेतली जाते. परिचारिका पीपीई किट घालत असल्याने त्यांना सहा तासांपेक्षा जास्त ड्युटी दिली जात नाही. त्यामुळे परिचारिकांची ड्युटी २४ तासांत चार शिफ्टमध्ये लावली जाते. तोच नियम वॉर्डबॉयसाठी आहे.

एक दिवस दिली जाते विश्रांती
केडीएमसीतील डॉक्टर शास्त्रीनगर रुग्णालय आणि महापालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये सेवा देत आहेत. त्यांना आठवड्यातील एक दिवस विश्रांती दिली जात असून एखाद्याला बाधा झाल्यास त्याला नियमाप्रमाणे १० दिवस होम क्वारंटाइन होण्यास सांगितले जाते. डॉक्टरांसह परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे
- मिलिंद धाट, उपायुक्त, वैद्यकीय आरोग्य विभाग

डॉक्टरांची नियमित तपासणी
डोंबिवलीतील आयएमएचे डॉक्टर अहोरात्र सेवा देत आहेत. कोविड रुग्णालयांबरोबरच महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातही ते सेवा बजावत असल्याचे आयएमएचे हॉस्पिटलप्रमुख डॉ. मंगेश पाटे म्हणाले.
कल्याणमधील डॉक्टरांना आळीपाळीने सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, परिचारिका आणि वॉर्डबॉयच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जात असल्याचे डॉक्टर आर्मीचे डॉ. प्रशांत पाटील म्हणाले.
नियमितपणे डॉक्टरांच्या तपासण्या करतो. सर्वांना पीपीई किट बंधनकारक केले आहे तसेच डॉक्टरांच्या आणि इतर कर्मचाºयांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त आहारावर भर दिला जात असल्याचे वन रूपी क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus News: Doctors prioritize duty despite stress; Special emphasis on protein rich diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.