CoronaVirus News : कोविड रुग्णालयातील व्हेंटिलेटर शोभेसाठी, रुग्णांवर होत नाहीत उपचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 00:54 IST2020-06-25T00:54:38+5:302020-06-25T00:54:55+5:30
या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी निघून जात आहेत. तर, दुसरीकडे या रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर हे केवळ शोभेसाठी असल्याचे समोर आले आहे.

CoronaVirus News : कोविड रुग्णालयातील व्हेंटिलेटर शोभेसाठी, रुग्णांवर होत नाहीत उपचार
पंकज पाटील
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून उभारलेले ७०० खाटांचे रुग्णालय रुग्णांना सेवा देण्यात अपुरे पडत आहे. श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना या ठिकाणी योग्य उपचार मिळत नसल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी निघून जात आहेत. तर, दुसरीकडे या रुग्णालयातील दोन व्हेंटिलेटर हे केवळ शोभेसाठी असल्याचे समोर आले आहे.
अंबरनाथ पालिकेने डेंटल कॉलेजमध्ये कोविड रुग्णालय उभारले आहे. मात्र, या रुग्णालयाची अवस्था पाहता तेथे केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार होऊ शकतात ही बाब समोर आली आहे. बहुसंख्य डॉक्टर हे शिकावू असल्याने त्यांच्याच भरवशावर हे रुग्णालय सुरू आहे. एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने पालिकेने शहरातील डॉक्टरांना रुग्णालयात सेवा देण्याची विनंती केली होती. त्यानुसार काही डॉक्टर सेवाही देत आहेत. मात्र ही सेवाही अपुरी पडत आहे. काही रुग्णांना श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना आॅक्सिजन कक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि त्यांची योग्य देखरेखही करणे गरजेचे आहे. मात्र या ठिकाणी योग्य नियोजन होत नसल्याने अजूनही या रुग्णालयावर नागरिकांचा विश्वास बसलेला नाही.
श्वसनाचा त्रास जाणवणारे रुग्ण थेट या रुग्णालयांमधून बाहेर पडत आहेत. एका महिन्याच्या आतच पालिकेने हे कोविड रुग्णालय उभारले होते. मात्र ते चालविण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा अजूनही रूळावर आलेली नाही.
>रुग्णाकडे होते दुर्लक्ष
या रुग्णालयात एक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाल्यावर लागलीच त्याला दुसºया दिवशी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्याने डॉक्टरांना याची कल्पना दिली. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले. अखेर, त्या रुग्णाने पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाचा मार्ग अवलंबला.