CoronaVirus Lockdown News: जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार पुन्हा निघाले मूळगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 01:07 IST2021-04-08T01:07:12+5:302021-04-08T01:07:32+5:30
मिनी लाॅकडाऊनचा धसका

CoronaVirus Lockdown News: जिल्ह्यातील परप्रांतीय कामगार पुन्हा निघाले मूळगावी
कल्याण : राज्य सरकारने कोरोना रोखण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत नव्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवली जाणार आहेत. त्याचा फटका किरकोळ दुकानातील कामगारांना बसला आहे. एक महिन्यात स्थिती सुधारली नाही तर पुन्हा उपासमारीची वेळ येऊ शकते, या भीतीपोटी अनेक परप्रांतीय कामगारांनी पुन्हा त्यांच्या गावची वाट धरली आहे. ते कल्याण रेल्वेस्थानकातून त्यांच्या गावी परतत आहेत. अनेकांनी तर पुन्हा पायीच वाट धरली आहे. यामुळे पत्रकार विनोद कापरी यांच्या ‘१२३२ या डॉक्युमेंटरीचे शीर्षक गीत मरेंगे तो वही पर जहाँ जिंदगी है,’चा आवाजच जणू पोटाची खळगी भरण्यासाठी मुंंबईत आलेल्या परंतु, लॉकडाऊनमुळे मूळ गावी निघालेल्या या मजुरांच्या हालचालीतून घुमू लागला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर देशात २४ मार्च २०२०पासून लॉकडाऊन लागू केला होता. त्यावेळी राज्यातील परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी प्रवासी सेवा बंद असल्याने कामगारांनी गावची वाट धरण्यासाठी शेकडो किलोमीटर चालत जाऊन गाव गाठले होते. आता पुन्हा सर्व दुकाने बंद केली आहेत. त्यावेळी काही दिवस अन्नपाण्याची सोय झाली होती. काहींनी उसने पैसे घेतले होते, तर काहींनी परप्रांतीयांना गावी जाण्याची सोय केली होती. आता पुन्हा कोण पैसा पाणी देणार, असा प्रश्न या परप्रांतीय कामगारांपुढे आहे.
कल्याण स्थानक हे रेल्वेचे जंक्शन आहे. या कल्याण स्थानकातून उत्तर भारतात लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. कल्याणहून उत्तर प्रदेशच्या दिशेने दररोज किमान ५० हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. त्यात परप्रांतीय कामगार असलेल्या प्रवाशांचाही समावेश आहे. आता गाड्यांची सुविधा सुरू असल्याने गावी परतलेले बरे, असा विचार परप्रांतीय कामगारांनी केला आहे. गावी परतणाऱ्यांमध्ये पानटपरीचालक, सलून कामगार, स्टुडिओ चालविणारे आणि बिगारी यांचा समावेश आहे.
कल्याणमध्ये बिगारी काम करणारे नरेश बिरदार हे त्यांची पत्नी माया आणि मुलगा छोटू यांच्यासोबत राहात होते. त्यांना दररोज ६०० रुपये बिगारी मिळत होती. मिनी लॉकडाऊन लागू झाल्याने त्यांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे. ६०० रुपयांत घराचा खर्च भागत नाही. घरभाडे कसे द्यायचे ? कामच बंद झाल्याने काय करणार ? त्यामुळे त्यांच्या उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात परतत आहेत. काश्मीर येथे राहणारे संतोष वर्मा आणि रमांकात वर्मा हे एका स्टुडिओत काम करीत होते. त्यांचा स्टुडिओ बंद झाल्याने ते त्यांच्या गावी परतत आहेत. दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद असल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
पोटाला काय खाणार?
वसईतील सलूनचालक राजेश शर्मा म्हणाले, नव्या निर्बंधांमुळे सलून बंद झाल्याने हाताला काम नाही. इथे राहून करणार काय आणि पोटाला खाणार काय ? असा प्रश्न आहे. त्यामुळे ते गावी जात आहेत. भिवंडीत पानटपरी चालविणाऱ्या लाल देव हे आझमगड येथील गावी निघाले आहेत. त्यांच्यासोबत अन्य सहा लोक आहेत. ते सहा लोक अन्य आस्थापनात काम करतात. पानटपरी बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने ते व त्यांचे साथीदार गावी निघाले आहेत.