CoronaVirus: In just four days, vegetable prices soared; Crowds in the market, but lick the pockets of customers | CoronaVirus: अवघ्या चार दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; मार्केटमध्ये गर्दी, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट

CoronaVirus: अवघ्या चार दिवसांत भाज्यांचे दर कडाडले; मार्केटमध्ये गर्दी, ग्राहकांच्या खिशाला मात्र चाट

ठाणे  : अनलॉक दोन जाहीर झाल्यानंतर ठाणे महापालिकेने मात्र संपूर्ण ठाणे शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुधवारी भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. परंतु यावेळी भाजीचे दर अचानक कडाडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 20 रुपयांची कोथिंबिरीची जुडी 80 रुपये झाल्याचे दिसून आले. तर इतर भाज्यांचे भावही दुप्पट, तिप्पट झाल्याचे दिसून आले आहे. असे असताना नागरिक मात्र पुढील 10 दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करीत होते.

तर ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर वाढल्यानेच भाजीचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु पुढील 10 दिवस लॉकडाऊन असल्याने विक्रेते हे ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. पुढील 10 दिवस संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे बुधवारी ठाणेकर नागरिकांनी पुन्हा एकदा जांभळी नाका येथील भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. परंतु भाज्यांचे वाढलेले दर पाहून त्यांची आज झोपच उडाल्याचे दिसून आली. प्रत्येक भाजीचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे दिसत होते. आधीच तीन महिन्यांनंतर कामाला कुठे सुरुवात झाली होती, पगार कमी झाले आहेत, काहींच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. अशातच आता विविध वस्तुंच्या वाढत्या दरांमुळे नागरीक हैराण झाले आहे. चार दिवसापूर्वी भाजी खरेदी करताना 20 रुपये असलेले दर 40 ते 80च्या घरात गेलेच कसे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आधीच खाण्याचे आबाळ सुरू असताना आता भाज्याही कडाडल्या तर खायचे काय, जगायचे कसे असा सवाल नागरिक करीत आहेत.

भाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढले आहेत, सर्वच भाज्यांचे दर वाढलेले आहेत, व्यापाऱ्यांवर कोणाचे कंट्रोल नाही, शासनाकडे वाढणा:या दरांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. परंतु त्याकडे त्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
(प्रकाश ताम्हाणे  - ग्राहक, ठाणेकर)

रोजपेक्षा जास्तीचे दर आकारले जात आहेत, गुरुवार पासून बंद ठेवण्यात येणार असल्यानेच विक्रेते लुट करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीही तयार नाही.
(प्रतिभा माने - गृहिणी, ठाणेकर)

पुढील 10 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून आम्ही भाज्यांचे दर वाढवलेले नाहीत. उलट ट्रान्सपोर्ट आणि हमालांचे दर हे दुप्पट, तिप्पट झाल्यानेच आम्हाला नाईलाज आहे. त्यामुळेच भाज्यांचे दर वाढलेले आहेत.
(भाजी विक्रेते - जांभळीनाका मार्केट)
आजचे भाज्यांचे दर
भाजी                           पूर्वी         आता
कोबी                      30 रुपये   50 रुपये
शिमला मिर्ची            50          80
टॉमेटो                    30          80
भेंडी                      40          60
गवार                     60          80
कोथिंबीर                20          80
शेपु                       30         40
काकडी                 20         40
मेथी                      20         40
पालक                   10         20

Web Title: CoronaVirus: In just four days, vegetable prices soared; Crowds in the market, but lick the pockets of customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.