Coronavirus: न दिसणाऱ्या काेराेनानं उघडले सर्वांचे डाेळे; फक्त रक्ताचे नातेवाईक आपल्या जवळचे नसतात, तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 02:19 IST2021-03-22T02:19:15+5:302021-03-22T02:19:38+5:30
२३ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले. कधीही अशा परिस्थितीचा सामना न करणारे तुम्ही आम्ही अचानक घरात कैद झालाे.

Coronavirus: न दिसणाऱ्या काेराेनानं उघडले सर्वांचे डाेळे; फक्त रक्ताचे नातेवाईक आपल्या जवळचे नसतात, तर...
कराेना काेराना काेराेना... कधीही एकिवात न असणारा विषाणू संपूर्ण जगभरात पसरला आणि संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व संकटात आले. डाेळ्यांनी न दिसणाऱ्या या विषाणूने हाहाकार माजवला. चीनमध्ये निर्माण झालेला हा विषाणू भारतात वणव्यासारखा पसरला आणि संपूर्ण मानवजात ही संकटाच्या खाईत ढकलली गेली.
२३ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन सुरू झाले. कधीही अशा परिस्थितीचा सामना न करणारे तुम्ही आम्ही अचानक घरात कैद झालाे. फक्त जीवनावश्यक वस्तूच तेवढ्या मिळायला लागल्या. हातावर पाेट असणारे लाेेक आपल्या मूळ गावी जायला निघाले. बस, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाली, तरी लाेक खासगी वाहनाने तर काेणी चक्क पायीच कुटुंबातील सदस्यांना घेऊन मार्गक्रमण करायला निघाले. याच काळात माणुसकीचे दर्शन घडले. अनेक सामाजिक संस्थांनी गरजू लाेकांना धान्यवाटप केले. त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. पडद्यावर खलनायकाची भूमिका करणारा साेनू सूदसारखा अभिनेता प्रत्यक्ष जीवनात सर्वांसाठी हिराे ठरला. माणसांतच देव आहे आणि संकटात जाे धावून येताे ताेच खरा माणूस हाेय, याची प्रचीती या काळात आली.
या काेराेनाने आपल्याला खूप काही शिकवले. घरात एकमेकांसाठी भरपूर वेळ द्यायला शिकवले. छंद, आवडी-निवडी जाेपासता आल्या. मी शिक्षिका असल्यामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नव्हता. मात्र, या लाॅकडाऊनमध्ये मला माझ्या मुलांसाठी वेळ देता आला. काेराेना काळात साेसायटीतील लाेकदेखील कुटुंबाप्रमाणे वाटायला लागले. मुख्य म्हणजे ऑनलाइन बऱ्याचशा गाेष्टी यामुळे शिकायला मिळाल्या. माेबाइल सर्वांचा अत्यंत जवळचा मित्र बनला. आता माेबाइलचे फायदे व ताेटे दाेन्ही आहेत. मात्र, हाच माेबाइल सर्वांचा जिवलग असा मित्र बनला.
या काळात मला समजले की, फक्त रक्ताचे नातेवाईक आपल्या जवळचे नसतात, तर माणुसकीचे नाते त्याहून महान असते. आपल्या आजूबाजूला नीट पाहिले तर खराेखरच आपल्या नातेवाइकांपेक्षा जास्त जवळचे आपले शेजारी आणि परिसरातील लाेक असतात. याकाळात सर्वांना माेठा धडा मिळाला असेल तर ताे स्वच्छतेचा. एकमेकांपासून सुरक्षित अंतर, वारंवार हात धुण्याची सवय, मास्क लावणे, गर्दी टाळणे यामुळे सर्वत्र स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. प्रदूषणही कमी झाले. ध्वनी प्रदूषण कमी झाले. स्वच्छतेचे महत्त्व आपणा सर्वांना काेराेना शिकवून गेला. काेराेनाने आपल्याला एक महत्त्वाची गाेष्ट शिकवली, ती म्हणजे आर्थिक शिस्त, सावर्जनिक ठिकाणच्या स्वच्छतेचे महत्त्व. डाेळ्यांनी न दिसणाऱ्या काेराेनाने आपणा सर्वांचे डाेळे उघडले.
वर्षा राठाेड, सहशिक्षिका, कल्याण