Coronavirus: कोरोनामुळे ढोल-ताशा पथकांच्या यंदाही ऑर्डर्स झाल्या रद्द; सलग दुसऱ्यावर्षी लागला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 23:29 IST2021-03-22T23:28:35+5:302021-03-22T23:29:01+5:30
शिवयजंयती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा या सण उत्सवात ठाणे शहरात हमखास ढोल-ताशांचा गजर असतो.

Coronavirus: कोरोनामुळे ढोल-ताशा पथकांच्या यंदाही ऑर्डर्स झाल्या रद्द; सलग दुसऱ्यावर्षी लागला ब्रेक
ठाणे : शहरात गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशा पथकांचा गजर ऐकायला मिळतो; परंतु कोरोनामुळे यावषीर्ही पथकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या असून, त्यामुळे ढोल-ताशा पथकांचा आवाज निनादणार नाही. इतर सण उत्सवानिमित्त केल्या जाणाऱ्या पथकांच्या सरावाला सलग दुसऱ्या वर्षी ब्रेक लागला आहे.
शिवयजंयती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, महाशिवरात्री, दिवाळी पहाट, दिवाळी पाडवा या सण उत्सवात ठाणे शहरात हमखास ढोल-ताशांचा गजर असतो. कोरोनामुळे सण उत्सवांवर निर्बंध आल्याने यावर्षीही ढोल-ताशा पथकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी ढोल-ताशांचे पथक या यात्रेची शोभा वाढवितात. ठिकठिकाणी ढोल-ताशांचा आवाज निनादत असतो.
यंदा मात्र ऑर्डर्स रद्द झाल्याने पथकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सलग दुसऱ्या वर्षी त्यांच्या ऑर्डर्स्ला ब्रेक लागला आहे. तसेच, सरावालाही परवानगी नसल्याने शहरातील ढोल-ताशा पथकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी या पथकांनी ढोल-ताशांचे सामान विकत घेतले होते, तेदेखील तसेच पडून राहिल्याने त्याचा वापर होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनआधी ढोल-ताशांचे व्यापाऱ्यांकडून सामान मागविले होते. मार्च - एप्रिलमध्ये ऑर्डर्स रद्द झाल्या. आता सामान तसेच पडून आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्व तयारी केली होती; परंतु कोरोनाचे निर्बंध पुन्हा लागले. सगळ्या सामानांचे पैसे देण्याचे राहिले असून, आर्थिक गणित बिघडले आहे. मागच्या रविवारी सराव करायला घेतला होता, पण पोलिसांनी बंद करायला सांगितले. - संतोष शिगवण, शिवरुद्र ढोल-ताशा पथक
ढोल-ताशांचे सामान विकायची वेळ आली आहे. वर्षभर पथक बंद आहे. अंगावर कर्ज झाले असून, अनेक आर्डर्स रद्द झाल्या आहेत. पुढच्या गणेशोत्सवाला संधी मिळते की नाही याची शंकाच वाटते. सरावदेखील बंद आहे. - वैभव दाणे, शिवमल्हार ढोल-ताशा
गेल्या वर्षीपासून ऑर्डर्स बंद आहेत. ऑर्डर्स आल्या तरी परवानगी मिळत नाही. निर्बंध असल्यामुळे आता काहीच करू शकत नाही. ढोल-ताशांचे सामान तसेच पडून आहे. यावर्षीही ढोल-ताशा वाजवायची संधी मिळेल असे वाटत नाही. मिळाली तर वादकांच्या सहभागावर बंधनं येतील आणि १०-१५ वादकांमध्ये वाजविणे अशक्य आहे. - योगेश तेली, संस्कृती युवा प्रतिष्ठान