CoronaVirus News: ठाण्यात १५ ऑगस्टनंतर सर्व आस्थापना रोज सुरू; पालकमंत्र्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 03:13 IST2020-08-14T03:13:06+5:302020-08-14T03:13:21+5:30
सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत दररोज सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केट, जिम व स्विमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास केल्या.

CoronaVirus News: ठाण्यात १५ ऑगस्टनंतर सर्व आस्थापना रोज सुरू; पालकमंत्र्यांचा निर्णय
ठाणे : ठाणे महापालिका चांगले काम करीत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. १५ आॅगस्टनंतर शहरातील सम-विषमनुसार ज्या आस्थापना सुरू होत्या, त्या सर्व आस्थापना राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत दररोज सुरू ठेवण्याच्या तसेच मॉल्स, मार्केट, जिम व स्विमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास केल्या. दरम्यान, यावेळी शिंदे यांच्या हस्ते विसर्जन बुकिंग टाइम स्लॉट प्रणालीचे उद्घाटनही करण्यात आले.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठामपाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस खासदार राजन विचारे, मनपा आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के असून रुग्णदुपटीचा वेगही ९० दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे ३.५ टक्क्यांवरून ३.२ टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे, असे सांगून शिंदे यांनी आयुक्त आणि मनपा प्रशासनाचे कौतुक केले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (१) गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाड, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आदी उपस्थित होते.
आमची भूमिका सकारात्मक
कोरोनाविषयी महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांना ठाणेकरांसह व्यापाऱ्यांकडून चांगले सहकार्य मिळाले आहे. व्यापारी संघटनांनी सर्व आस्थापना सुरू करण्याबाबत केलेल्या विनंतीवर आमची भूमिका सकारात्मक आहे. - डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका