coronavirus: मीरा भाईंदरमध्ये एक्सप्रेस इन हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; पालिकेकडून हॉटेल सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 11:58 IST2021-02-21T11:57:06+5:302021-02-21T11:58:38+5:30
coronavirus: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता मीरा-भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरवात केली असून वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कोरोना रुग्ण आढळून आल्याने पालिकेने सील केले आहे .

coronavirus: मीरा भाईंदरमध्ये एक्सप्रेस इन हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; पालिकेकडून हॉटेल सील
मीरारोड - कोरोनाच्या वाढत्या रुग्णां मुळे आता मीरा भाईंदर महापालिकेने कारवाईला सुरवात केली असून वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन हे मोठे हॉटेल कोरोना रुग्ण आढळून आल्याने पालिकेने सील केले आहे . सदर हॉटेल मधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य ग्राहकांचा शोध घेणे अवघड होणार आहे .
मीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण मध्यंतरीच्या काळात कमी झाल्या नंतर महापालिका व पोलीस प्रशासना कडून सुद्धा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे बंद झाले . दुसरीकडे बेशिस्त नागरिकांसह अनेक नगरसेवक , राजकारणी देखील सर्रास नियमांचे उल्लंघन करत विना मास्क वावरत आहेत . त्यातूनच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे .
त्यातच नेहमी गर्दी असणाऱ्या वरसावे नाका , घोडबंदर मार्गावरील एक्स्प्रेस इन ह्या बड्या हॉटेलातील २१ कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळून आले . त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पालिकेचे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी १८ फेब्रुवारी पासून ४ मार्च पर्यंत हॉटेल इमारतच सील केली आहे . तसे आदेश त्यांनी सदर हॉटेलच्या दर्शनी भागात लावले आहेत .
ह्या घटनेने खळबळ उडाली असून सदर हॉटेलात रोज येणाऱ्या असंख्य ग्राहकां शोधणे अवघड झाले आहे . कारण कोरोनाग्रस्त हॉटेल कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे आवश्यक आहे . शासनाचे हॉटेल व कर्मचाऱ्यांसाठी दिलेले निर्देश स्पष्ट असले तरी त्याचे काटेकोर पालन केले जात नाहीत . खाण्या - पिण्या साठी आलेल्या लोकांना मास्क काढून ठेवण्या शिवाय पर्याय नसतो . त्यामुळे हॉटेल - बार हि कोरोना संसर्ग झपाट्याने पसरण्याची केंद्र ठरण्याची भीती व्यक्त होत आहे .