coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी झाली १४८७ कोरोना रुग्णांची वाढ, ३७ मृत्यूंची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 05:07 IST2020-09-03T05:07:15+5:302020-09-03T05:07:36+5:30
जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ८३९, तर मृतांची संख्या आता तीन हजार ६१४ झाली आहे.

coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी झाली १४८७ कोरोना रुग्णांची वाढ, ३७ मृत्यूंची नोंद
ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात एक हजार ४८७ रुग्णांसह ३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या एक लाख २६ हजार ८३९, तर मृतांची संख्या आता तीन हजार ६१४ झाली आहे.
यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक ४२९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या २९ हजार ६४९, तर मृतांची संख्या ६४८ वर गेली आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत २७३ बाधितांची, तर सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांची संख्या २६ हजार ४०६, तर मृतांची संख्या ८५१ वर गेली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९१ रुग्णांसह चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात ३३ बाधितांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांची संख्या चार हजार २५२ झाली. तसेच उल्हासनगरात २४ रुग्ण सापडले असून दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्ये ४४ रुग्णांची, तर दोन जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ३७, तर मृतांची संख्या १९० झाली. बदलापूरमध्ये ५५ नवे रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या चार हजार २४३ इतकी झाली.
वसई-विरारमध्ये १८३ नवे रुग्ण
वसई-विरार शहरात बुधवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १८३ नवे रुग्ण आढळून आले असून, १३८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १७ हजार ०६९ वर पोहोचली आहे. तर शहरात एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १४ हजार ७९८ इतकी झाली आहे.
नवी मुंबईत नऊ जणांचा मृत्यू
नवी मुंबई : शहरात दिवसभरात उपचारादरम्यान ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा एकूण आकडा ६०४ वर पोहचला आहे. नवी मुंबई पालिकेने मृत्यूदर शुन्यावर आणण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. आॅगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यात मृत्यूदर कमी करण्यात काही प्रमाणात यश आले. परंतु सद्यस्थितीमध्ये मृतांचा आकडा पुन्हा वाढला आहे.
रायगडात २४ तासांत ६७० रुग्णांची नोंद
अलिबाग : जिल्ह्यात बुधवारी (२ सप्टेंबर) ६७० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. गेल्या पाच महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी वाढ असल्याने जिल्ह्यात कोरोना चांगलाच फोफावत असल्याचे दिसून येते. दिवसभरात १३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बुधवारी अखेर बाधित रु ग्णांची संख्या २७ हजार ८६३ वर पोहोचली आहे. त्यापैकी २३ हजार ९२९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.