नागरिकांच्या चुकांमुळे वाढला वागळेत कोरोनाचा संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 02:29 IST2020-04-30T02:28:49+5:302020-04-30T02:29:01+5:30
तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही थेट २९ वर गेल्याने संपर्ण वागळे इस्टेट प्रभाग समिती ३ मे पर्यंत पूर्णपणे बंद केली आहे.

नागरिकांच्या चुकांमुळे वाढला वागळेत कोरोनाचा संसर्ग
ठाणे : अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडत आहात, समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करीत आहात, भाजीपाला आणण्यासाठी बाहेर पडत आहात, तर मग यापुढे काळजी घ्या. नाहीतर बाहेरून येताना तुम्ही घरात कोरोना आणत आहात, हे विसरू नका. कारण याच सवयींमुळे वागळे प्रभाग समितीत तीन ते चार दिवसांत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ही थेट २९ वर गेल्याने संपर्ण वागळे इस्टेट प्रभाग समिती ३ मे पर्यंत पूर्णपणे बंद केली आहे. येथील नागरिकांना आता अत्यावश्यक सेवांसाठीही बाहेर पडता येणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे इतरांच्या संपर्कात आल्याने येथील नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. या चुकांमुळे सीपी तलाव, किसनगर २,३ आणि भटवाडी आणि पडवळनगर, शिवाजीनगर व महाराष्टÑ नगर हे तीन स्पॉट आता हायरिस्कमध्ये आले आहेत.
पहिल्या हायरिस्क स्पॉटमध्ये ९ रुग्ण आहेत. सीपी तलाव परिसरात एका समाजसेवकामार्फत अन्नधान्य पुरवठा करण्यात येत होता. त्याच्या घरातीलच सहा लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या हायरिस्कमध्ये असलेल्या अन्य दोघांनाही लागण झाली आहे. कळवा रुग्णालयात लेबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचारी महिलेचाही यात समावेश आहे. येथील एक गरोदर महिला तपासणीसाठी मुलुंडला जात होती. तिलादेखील आता कोरोनाची लागण झाली आहे, तिला उपचारार्थ दाखल केले आहे.
दुसºया हायरिस्क स्पॉटमध्ये किसनगर २, ३ आणि भटवाडी हा परिसर आहे. या परिसरात ११ रुग्ण आढळून आले आहेत. येथे एका पोलिसाला लागण झाली, तर अन्य पती, पत्नी यांनाही कोरोनाची लागण झाली, तर अन्य एका कुटुंबातील दोघींनाही लागण झाली आहे. तर येथील एक तरुण समाजसेवेच्या उद्देशाने धारावीतील नागरिकांना जेवण घेऊ न जात होता, त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर येथील एक रिक्षाचालक हा नेहमी भाजीपाला आणण्याासाठी जात होता तोदेखील आता कोरोनाबाधीत झाला आहे. त्यामुळे तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी बाहेर जात असाल, तर सावध व्हा. आता तरी हाच संदेश यातून देण्याचा प्रयत्न आता केला जात आहे. तिसरा स्पॉट पडवळनगर, शिवाजीनगर आणि महाराष्टÑनगर हे परिसर हायरिस्कमध्ये आले आहेत. पडवळनगरमध्ये पाच रुग्ण आढळले असून, येथे एका दाम्पत्याला लागण झाली आहे. मुंब्य्रात येजा करणाºयाला लागण, तर आणखी एका दाम्पत्यालाही लागण झाली.
कारण नसताना घराबाहेर पडू नका, असे प्रशासनामार्फत वारंवार आवाहन करूनही अनेक नागरिक याकडे कानाडोळा करून घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे सामूहिक संसर्गाची लागण आता वागळे इस्टेटमध्ये झाल्याचे दिसून येत आहे.शिवाजीनगरमध्ये दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील एक रुग्ण हा रिक्षाने भाजीपाला आणत होता. येथील महाराष्टÑनगरातही एक रुग्ण आढळला आहे. त्याची प्रकृती बरी असून, रुग्णालयाने त्याला डिस्चार्जही दिला आहे. एकूणच समाजसेवा करणे, अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणे, भाजीपाला आणणे, जेवण देणे, दुसऱ्यांना मदत करणे आणि इतरांच्या संपर्कात आल्याने वागळे इस्टेटमधील रुग्णांचा आकडा काही दिवसांतच २९ वर जाऊन पोहोचला आहे.