कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज: पालकमंत्री एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 09:15 PM2020-03-30T21:15:48+5:302020-03-30T21:16:07+5:30

नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

Corona Virus in thane all the equipment ready to face the war: Eknath Shinde | कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज: पालकमंत्री एकनाथ शिंदे

कोरोना युद्धाचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज: पालकमंत्री एकनाथ शिंदे

Next

ठाणे :  कोरोनाचा सामना करण्यासाठी महापालिकेतील सर्व वैद्यकीय अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहे, या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काम करत असताना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेळ पडली तर खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी. कोरोना हे युध्द आपण जिंकणार आहोत असे सांगत केंद्रशासन, राज्यशासन सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज आहे, नागरिकांना सर्व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे, त्याचे पालन सर्वांनी करावे असे राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आज महापालिकेत झालेल्या बैठकीत केले.

            कोरोना याविषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी ठाणे महापालिकेत ‍ विविध प्रभागसमितीमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांची बैठक आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. या बैठकीस महापौर नरेश म्हस्के, सभागृह अशोक वैती, महापालिका आयुकत विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त 1 राजेंद्र  अहिवर, अति. आयुक्त 2 समीर उन्हाळे,  वैद्यकीय आरोग्य  अधिकारी  डॉ. अनिरुध्द माळगांवकर,  नोडल अधिकारी डॉ. केंद्रे  उपस्थीत होते. या बैठकीत विविध ठिकाणी काम करत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेवून त्या तातडीने सोडविण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनादिले.

            ठाणे शहरात ज्यांना होम कोरंटाईन केले आहे, अशा नागरिकांची चौकशी सतत सुरू ठेवा, या व्यक्ती शहरात फिरु नये याची काळजी घेणे देखील महत्वाचे असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभागसमितीमध्ये महापालिकेच्या आरोग्य केंद्राव्यतिरिक्त खाजगी डॉक्टरांच्या मदतीने साध्या आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्‍यकेंद्रे सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.  तसेच रुग्णांना दूरध्वनीवरुन देखील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आली असून त्यांचे नंबर देखील महापालिकेच्या Digithane या  व्टीटरवर  प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संपूर्ण प्रभाग समितीत सोडियम हायपोक्लोराईडनेनिर्जतुंकीकरण करण्यासाठी  अत्याधुनिक फवारणी यंत्रे दाखल झाली असून त्यामार्फत फवारणीचे काम देखील सुरू करण्यात आले असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. आरोग्य केंद्रात काम करत असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांना सर्व्हे करण्याच्या कामासाठी तातडीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आदेश काढण्यात यावे, त्यांना सर्व  प्रशिक्षण दिले जाईल, जे कर्मचारी हजर होणार नाही त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेशही यावेळी महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

            परदेशातून आलेल्या नागरिकांना कोविड 19 चाचणी सक्तीची करणे गरजेचे आहे. वागळे इस्टेट येथे कोविड 19 ची चाचणी करण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील  रुग्णांना सवलतीच्या दरात ही चाचणी देणेबाबत त्यांच्याशी चर्चा करुन यावर मार्ग काढावा असे आदेशही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभागाला दिले आहे.

            ठाणे महापालिकेच्या 9 प्रभागसमितीमध्ये प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करावी. सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील रुग्णांची तपासणी करताना स्वत:ची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी. तसेच होम कोरंटाईन असलेल्या रुग्णांच्या अडचणी समजून घेवून त्यांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कोरोना या संकटाचा सामना आपल्याला सगळ्यांना मिळून करावयाचा आहे, हे युध्द आहे आणि ते युध्द आपण  ‍ जिंकणारच आहोत असेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. ठाण्याचे महापौर, लोकप्रतिनिधी हे सर्वचजण प्रशासनाच्या पाठीमागे आहे, गरज पडली तर नि:संकोचपणे कोणाशीही संपर्क साधा, आपल्याला योग्य ती मदत तातडीने दिली जाईल असेही त्यांनी या बैठकीदरम्यान सांगितले.

            नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी सेंट्रल मैदान येथे भाजी मार्केट तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी संपूर्णपणे सोशल डिस्टान्स पाळले जात आहे. नागरिकांनी या भाजी मार्केटचा लाभ घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना  केले  आहे.

Web Title: Corona Virus in thane all the equipment ready to face the war: Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.