Corona Virus: गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेवरही कोरोनाचे सावट; ठाणेकरांमध्ये धास्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 00:35 IST2020-03-13T00:34:50+5:302020-03-13T00:35:22+5:30
जिल्हाधिकारी घेणार लवकरच बैठक

Corona Virus: गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेवरही कोरोनाचे सावट; ठाणेकरांमध्ये धास्ती
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात दरवर्षी नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली जाते. कोरोनामुळे ही स्वागतयात्रा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत दोन-तीन दिवसांत बैठक घेतली जाईल, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच सार्वजनिक कार्यक्रम न करण्याचे आवाहनही केले जात आहे. भिवंडीत संशयित रुग्ण आढळल्यानंतर ठाणेकरांनीही कोरोनाची धास्ती घेतली आहे. या वेळी धूलिवंदनावर कोरोनाचे सावट पाहायला मिळाले.
कोरोनाच्या भीतीमुळे धुलिवंदनासाठी बहुतांश ठाणेकर घराबाहेर पडलेच नाहीत, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे रंगांची उधळण झाली नाही. होळीनंतर येणारा गुढीपाडवा हा सण. यापार्श्वभूमीवर ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रा आयोजित केली जाते. यात विविध संस्था, चित्ररथ सहभागी होतात.
नववर्ष स्वागतयात्रेबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, दोन ते तीन दिवसांत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. किती ठिकाणी या स्वागतयात्रा निघतात, याचीदेखील माहिती घेतली जाणार आहे. स्वागतयात्रेचे आयोजक याबाबत आठ दिवसांनी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे स्वागतयात्रा काढली जाते की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.