Corona Vaccination: ६२ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 01:32 IST2021-04-04T01:31:46+5:302021-04-04T01:32:02+5:30
कोरोना प्रतिबंधक लस; जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश

Corona Vaccination: ६२ हजार कर्मचाऱ्यांनी घेतला दुसरा डोस
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक पहिला डोस घेतला होता. त्यानंतर शनिवारी त्यांनी दुसरा डोस घेऊन लसीकरणाचे दोन्ही डोस यशस्वीरीत्या पूर्ण केले. याप्रमाणे जिल्ह्यातील अन्यही ६१ हजार ९९६ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि अन्य नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक दुसरा डोस घेऊन कोरोनाच्या संकटावरील मळभ हलके केले.
सिव्हिल रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांनी या लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित केल्याचे ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील ३,४४२ लसीकरण केंद्रांवर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पहिल्या फळीतील २,६९,६१३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. ६१,९९६ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कोरोना प्रतिबंधात्मकचा दुसरा डोस यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचे ते म्हणाले.
जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील ७०,५९५ डॉक्टर, परिचारिका आदींनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला आहे. त्यापैकी ३६ हजार ८९३ जणांनी त्यांचा दुसरा डोसही लसीकरण केंद्रांवर जाऊन आतापर्यंत पूर्ण केलेला आहे. याप्रमाणेच पहिल्या फळीतील पोलीस यंत्रणेतील ५२,४६२ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतला असून, २४,०३० जणांनी या लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे.
याप्रमाणेच ४५ ते ६० वर्षे वयोगटातील २५,१६० नागरिकांनी लसीकरणाचा पहिला डोस जिल्हाभरातून घेतला आहे. तर, यापैकी १९१ जणांनी त्यांचा दुसरा डोस घेतला आहे. याशिवाय ६० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील १,२१,३९६ ज्येष्ठांनी त्यांचा पहिला डोस घेतला आहे. यापैकी ८८२ ज्येष्ठांनी आतापर्यंत दुसरा डोस घेऊन कोरोनाला पळवून लावण्यास सज्जता दाखवली आहे.
ठाण्यातील दीड लाख नागरिकांनी शनिवारअखेर घेतली लस
ठाणे : शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण सुरू असून शनिवारअखेर एक लाख ५० हजार ४१३ लाभार्थ्यांचे ठाणे मनपाच्या आरोग्यकेंद्रात, खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण झाले आहे. आतापर्यंत ठामपाच्या लसीकरण केंद्रांवर २० हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ११ हजार १७७ कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
खाजगी रुग्णालयांमध्ये ९९ जणांना पहिला, तर एक हजार ६४० जणांना दुसरा डोस दिला आहे. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांपैकी ठामपाच्या केंद्रात १७ हजार ३९५ लाभार्थ्यांना पहिला व आठ हजार २६५ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला असून खाजगी रुग्णालयात ६४४ लाभार्थ्यांना पहिला व १८ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे.
४५ ते ६० वयोगटांतर्गत ठामपा केंद्रात ९,७८३ जणांना पहिला, तर ८६ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला गेला आहे. याच वयोगटांतर्गत खाजगी रुग्णालयांतील केंद्रामध्ये ५,६०४ जणांना पहिला व दोन लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला गेला आहे. ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये ठामपा केंद्रात ५३,१८१ जणांना पहिला तर, ४४२ लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला आहे.