Corona vaccination: मुंब्य्रात लसीकरणाला ५० % प्रतिसाद, डॉक्टरांना विनंती करूनही देतात नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 02:10 IST2021-02-03T02:09:34+5:302021-02-03T02:10:18+5:30
Corona vaccination: ठाणे शहरात डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण शंभर टक्के झाले असताना मुंब्रा येथे लसीकरण मोहिमेतही ५० टक्के लक्ष्य साध्य झाले आहे.

Corona vaccination: मुंब्य्रात लसीकरणाला ५० % प्रतिसाद, डॉक्टरांना विनंती करूनही देतात नकार
ठाणे : शहरात डॉक्टर, फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण शंभर टक्के झाले असताना मुंब्रा येथे लसीकरण मोहिमेतही ५० टक्के लक्ष्य साध्य झाले आहे. ठाण्यात कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असतांना मुंब्य्रात डॉक्टर आणि फ्रन्टलाईन वर्कर्सनी लसीकरणाकडे पाठ फिरविली असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येथील लसीकरण वाढत नसल्याने वाढीव केंद्रही सुरू करण्यासाठी महापालिका पुढाकार घेत नसल्याचे दिसून आले आहे.
मागील महिन्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार पहिल्या आठवड्यात ठाण्यात केवळ चार सेंटर सुरू करण्यात आली होती. परंतु आता सेंटरची संख्या १५ झाली असून, प्रत्येक सेंटरवर १०० जणांना ही लस दिली जात आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला २२ हजार ६९२ डॉक्टर आणि १२ हजार ७८० फ्रन्टलाईन वर्कर असे मिळून ३५ हजार ४७२ जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. आतापर्यंत ९,२८४ डॉक्टर आणि फ्रन्टलाईन हेल्थ वर्करचे लसीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण ठाणे शहरात सोमवारी १४५ टक्के लसीकरण झाले आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करायची तयारी पालिकेने केली आहे.
मुंब्य्रात मात्र कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्याने उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचण येत आहे. लस नको म्हणून मुंब्य्रात डॉक्टरच नाकं मुरडत आहेत. त्यांना लस घेण्यासाठी वारंवार कॉल केले जात आहेत. त्यांना सेंटरपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु त्यांच्याकडून नकार दिला जात असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
१० टक्के डोस रोज जातात वाया
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून १५ सेंटरवर रोज लसीकरण सुरू आहे. रोजच्या रोज लसीचे १० टक्के डोस वाया जात आहेत. ते प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.