कोरोनाने रोजगार हिरावला, हिंसाचारही वाढला; कुटुंबप्रमुखांची चिडचिड गृहिणी, नवविवाहितांच्या जीवावर उठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:46 IST2021-03-21T00:46:22+5:302021-03-21T00:46:43+5:30
कळवा रुग्णालय हे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी दिले आहे. परंतु, महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी या रुग्णालयाच्या हिरकणी या छोट्याशा जागेत कोरोना काळातही जिल्हा केंद्र सुरू ठेवले.

कोरोनाने रोजगार हिरावला, हिंसाचारही वाढला; कुटुंबप्रमुखांची चिडचिड गृहिणी, नवविवाहितांच्या जीवावर उठली
सुरेश लोखंडे
ठाणे : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या. यामुळे घरातील कुटूंबप्रमुखांची चिडचिड वाढल्यामुळे गृहिणी आणि नवविवाहितांच्या जीवावरच ती उठली. त्यामुळे कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांसह दुर्दैवाने अन्याय, अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक हिंसा, बाललैंगिक अत्याचार अशा २४५ गंभीर घटना कोरोनाच्या संचारबंदीच्या कालावधीत घडल्या आहेत.
जिल्ह्यातील महिलांसंबंधित जीवघेण्या व किळसवाण्या ४१४ कौटुंबिक हिंसाचारासह अन्य नराधमांकडून घडल्या आहेत. कोरोनाच्या महामारीतही महिलांवर अन्याय अत्याचार झालेले आहेत. गेल्या वर्षापासून ते आतापर्यंत २४५ महिलांना हिंसाचाराच्या जीवघेण्या घटनांना तोंड द्यावे लागले आहे. यामध्ये सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचाराच्या ८९ घटनांसह, बलात्कार आणि लैंगिक हिंसेच्या ५६ तक्रारींची नोंद कळवा रुग्णालयातील सखी वन स्टॉप सेंटरच्या जिल्हा केंद्रात झाली आहे.
महिलांवरील अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी व गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सखी वन स्टॉप सेंटर सुरू केले आहे. यासाठी जिल्हास्तरीय केंद्र येथील छत्रपती शिवाजी हॉस्पिटल येथे सुरू आहे. जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमधील अशा घटनांची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी कार्यकर्ते, पोलीस तत्पर असून संबंधित महिलेला न्याय देण्यासाठी न्यायालयीन दरवाजेही थोटावले जात आहेत. कोरोनाच्या या कालावधीत महिलांवरील अन्याय, कौटुंबिकवाद, लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचे आढळले आहे.
कळवा रुग्णालय हे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी दिले आहे. परंतु, महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी या रुग्णालयाच्या हिरकणी या छोट्याशा जागेत कोरोना काळातही जिल्हा केंद्र सुरू ठेवले. परंतु वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे पीडित महिलांना या केंद्रांवर येणे शक्य होत नसे. त्यांची ही गरज लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या आदेशाने महिलांच्या मदतीसाठी कोरोना काळात हेल्पलाइन सुरू करून पीडित महिलांची मदत या सखी सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याचा अनेकींना फायदा झाला.
कोरोनाकाळात हेल्पलाइनव्दारे ऐकल्या महिलांच्या तक्रारी
कोरोनाच्या भीतीला न जुमानता या सखी वन स्टॉप सेंटरचे केंद्र प्रशासक कविता थोरात, सुप्रिया शेळके, स्मिता मंडपमळवी, विशाल गायकवाड, योगिता बुरटे, बालकृष्णा रेड्डी आदी १६ जणांची टीम जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या रुग्णालयांत उपचार घेणा-या पीडित महिलांची भेट घेऊन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय मिळवून देण्यात आघाडीवर आहे.
कोरोनाच्या या कालावधीत रोजगार गेल्यामुळे, विविध कारणांनी वाढलेले अन्याय, अत्याचार, ताणतणाव, महिलांवरील अन्याय, अत्याचारांच्या केसमध्ये कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार तसेच मुलामुलींवर होणारे लैंगिक हिंसाचार याचे गुन्हे जास्त आहेत. ठाणे शहरी भागामध्ये कौटुंबिक आणि लैंगिक हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे.
आधीच्या ४१४ घटनांसह कोरोनाकाळातील २४५ प्रकरणांमध्ये मध्यस्थी
२०१७ पासून कोरोनाच्या आधी घडलेल्या ४१४ घटना व कोरोनानंतर आतापर्यंत २४५५ कौटूंबीक हिंसाचारासह अन्याय, अत्याचार झालेल्या महिलांना आधार देऊन त्यांच्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढाई सखी वन स्टॉप सेंटरने लढली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून या सेंटरच्या अधिकारी वर्गासह सामाजिक कार्यकर्त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे.