कोरोनामुळे २५ दिवसांत ४४२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:42 IST2021-05-27T04:42:30+5:302021-05-27T04:42:30+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या ...

कोरोनामुळे २५ दिवसांत ४४२ जणांचा मृत्यू
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी काही दिवसांपासून मृतांची संख्या २२ ते २४ च्या आसपास आहे. एप्रिलमध्ये १७८, तर मे महिन्यात मागील २५ दिवसांत मृतांची संख्या तब्बल ४४२ वर पोहोचली आहे. रुग्णांचे मृत्यू हे केवळ २४ तासांतील नाहीत, असा दावा मनपाकडून केला जात असला तरी मागील काही दिवसांत मृत्यूदर हा १.१९ वरून १.४२ टक्क्यापर्यंत वाढल्याचेही पाहायला मिळत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मंगळवारपर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एकूण एक लाख ३२ हजार सहा रुग्ण आढळले. एक हजार ८७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख २७ हजार ३९० इतके रुग्ण बरे झाले आहेत. सध्या दोन हजार ७४० कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर मांडला होता. या महिन्यात ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले. तर, ३७ हजार ६२० रुग्ण महिनाभरात उपचाराअंती बरे झाले. असे असलेतरी १७८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मे महिन्यात दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण घटले असले तरी मृतांची संख्या वाढली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत चार ते पाच मृत्यूंची नोंद होत असत; परंतु २१ एप्रिलपासून यात वाढ होऊन मृतांची संख्या १३ वर गेली. मे महिन्यात तर दररोज २० ते २३ मृत्यू होत आहेत. २३ मे रोजी आजवरचे सर्वाधिक २४ मृत्यू नोंदले गेले.
दरम्यान, २४ तासांत ज्या कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो, त्यांची संख्या दररोज दिली जाते. सध्या ही संख्या आठ ते नऊच्या आसपास आहे; परंतु जे रुग्ण संशयित म्हणून दाखल होतात आणि नंतर मृत पावतात त्यांचे अहवाल इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून (आयसीएमआर) आल्यानंतर त्यांचा समावेश दैनंदिन मृतांच्या आकडेवारीत केला जात असल्याने संख्या वाढल्याचे मनपाचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नोंद होणारे मृत्यू हे मार्च-एप्रिल महिन्यातील आहेत. त्या वेळेला मोठ्या संख्येने रुग्ण आढळत होते. त्यात मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक म्हणजे दिवसाला २० ते २५ इतके होते; परंतु त्याची नोंद त्यावेळी अपुऱ्या माहितीअभावी होऊ न शकल्याने उशिराने म्हणजेच मे महिन्यात ती नोंद होत असल्याचे बोलले जात आहे.
-----------
कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक मृत्यू
- जिल्ह्याचा आढावा घेता कोरोनामुळे होणारे मृत्यू कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ठाणे आघाडीवर होते; परंतु दुसऱ्या लाटेत कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक मृत्यू आहेत.
- दीड वर्षात आतापर्यंत एक हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे मनपा हद्दीत एक हजार ८६५ जणांचा मृत्यू झाला आहे.
- नवी मुंबईत एक हजार ५६९, मीरा-भाईंदर १,२५४, भिवंडी ४३४, उल्हास नगरमध्ये ४६७, अंबरनाथ ४०३, कुळगाव-बदलापूर २४३ आणि ठाणे ग्रामीणमध्ये ८५२ कोरोना मृत्यूंचा समावेश आहे.
-------------