कोरोना महामारीचे संकट हे तर अंधश्रद्धेकरिता पोषकच; ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 11:55 PM2020-09-20T23:55:21+5:302020-09-20T23:56:02+5:30

पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे मत : ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण, सोशल मीडिया ठरू शकतो धोकादायक

The Corona epidemic is a catalyst for superstition | कोरोना महामारीचे संकट हे तर अंधश्रद्धेकरिता पोषकच; ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण

कोरोना महामारीचे संकट हे तर अंधश्रद्धेकरिता पोषकच; ‘गणपती दूध प्यायला’ या घटनेला २५ वर्षे पूर्ण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘गणपतीदूध पितो’ यासारख्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना वरचेवर घडत असून कोरोना महामारीमुळे लोकांमध्ये पसरलेली घबराट, बेरोजगारी, आर्थिक नुकसान हे अशा घटनांकरिता पोषक वातावरण आहे. २५ वर्षांपूर्वी जेव्हा गणपतीदूध पितो ही अफवा पसरली तेव्हा सोशल मीडिया नव्हता. आता सोशल मीडियावर ज्या वेगाने अफवांचा प्रसार होतो ते पाहता अशा अंधश्रद्धांच्या प्रसाराकरिता सोयीस्कर साधनेही लोकांना उपलब्ध आहेत, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते, पुरोगामी कार्यकर्ते यांनी व्यक्त केले. ‘गणपती दूध पितो’ या घटनेला २१ सप्टेंबर २०२० रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी संपूर्ण जगभर ही वार्ता पसरली होती. त्यानंतर या घटनेमागचे शास्त्रीय कारण पुढे आले आणि लोकांचा या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. पण अंधश्रद्धेवर लोकांचा विश्वास आजही आहेच. अशा घटना अधूनमधून घडल्या की लोकांचा विश्वास बसतो अशी मते मान्यवरांनी व्यक्त केली.

खरं तर परमेश्वर हा भक्ताला देणारा. तो भक्तांकडून कशाला काही घेईल? तरीही नवस, दक्षिणा आदी माध्यमातून मधले दलाल भक्तालाच लुटत असतात. अनेक देवस्थानात गडगंज उत्पन्न जमा होते. तेथे भोळी-भाबडी जनता मोठ्या संख्येने जमा होते. त्यामुळे जनसामान्यांच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घेण्याची, धर्माचा गैरवापर करण्याची राजकीय पक्षांत चढाओढ लागते. अनेक समाजसुधारक समाजाला या लुटमारीविरु द्ध सतत जागरूक करीत असतात. त्यामुळे समाजमानसात घुसळण होते, धर्माच्या नावाखाली लुटमारी करणाऱ्यांचे धाबे दणाणते. मग ते ‘गणपती दूध प्यायला’, सारखे खोटे चमत्कार घडवून आणतात. जनतेला पुन्हा अंधश्रद्धांना जुंपण्याचा घाट यातून घातला जातो. ही झटापट सतत चालू रहाणार. जनतेच्या गरजा भागविण्यासाठी धडपड करणे ही राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. परंतु ती पार पाडण्याऐवजी, जनतेला अंधश्रद्धांमध्ये गुरफटवण्याचा शॉर्टकट धर्मांध राजकीय पक्ष चोखाळतात. कोरोनामुळे तर हे प्रकार वाढविण्याचे प्रयत्न होतील. भारतीय संविधानातील लोकशाही, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी जी मूल्ये आहेत, ती समाजात रुजवण्याचे सतत प्रयत्न करीत राहणे आवश्यक आहे. धार्मिक भावना व अंधश्रद्धांचा गैरफायदा घेत, लुटमारी करणाºयांना समाजासमोर उघडे पाडणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
- डॉ. संजय मंगला गोपाळ,
विश्वस्त, समता विचार प्रसारक संस्था

अशास्त्रीय गोष्टींनी खच्चून भरलेला धर्म आणि दैनंदिन जगण्यातील विज्ञान यांचे द्वंद्व सुरु असते. सध्या विचित्र कालखंडातून आपण जात असल्याने ‘गणपती दूध पितो’ अशा दंतकथा निर्माण केल्या जातील. गेल्या २५ वर्षात मीडिया जनतेच्या हातात आला तरीही धर्म आणि त्यातील अंधश्रद्धाचा समाजावर अजूनही किती पगडा आहे हे सतत जाणवत राहते. गोमांसाच्या वदंतेवरून गेल्या काही वर्षात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना याची प्रचिती देतात, समाज अजूनही त्याच अशास्त्रीय भ्रमात आहे आणि राजकारणी त्याचा बरोबर फायदा उठवीत आहेत. यामुळे प्रत्येक धर्माची चिकित्सा आणि विज्ञानाधिष्ठीत अभ्यासक्रम हाच यावरील उपाय आहे, असे वाटते, पण अभ्यासक्रम जोवर सरकार या राजकीय व्यवस्थेच्या हाती आहे तोवर त्यात आमूलाग्र बदल होणे कठीण आहे. धर्माचा वापर ज्या पद्धतीने राजकारणात होत आहे ते पाहता धर्माची चिकित्साही होणे शक्य नाही. त्यामुळे धर्म, राजकारण आणि विज्ञान हे आपापल्या परिप्रेक्षात एकत्र नांदू शकतील, याकरिता जनतेतून रेटा यायला हवा.
- प्रदीप इंदुलकर, सामाजिक कार्यकर्ता

गणपती दूध पितो ही घटना ‘क्राऊड सायकॉलॉजीमधून’ घडली. त्यावेळी मी फोर्टला कामाला होतो. सकाळी ही बातमी वाºयासारखी पसरली. रात्रीपर्यंत या घटनेचीच चर्चा होती. विश्वास बसत नाही आणि बोलताही येत नाही, अशी अवस्था त्यावेळी माझी होती. २१ वर्षापूर्वी गणपतीबद्दल शास्त्रीय दृष्टीकोनातून मी भाष्य केले तेव्हाही विरोध झाला होता. ‘गणपती दूध पितो’ या घटनेबद्दल मानसीकता बदलली तरी अंधश्रद्धा ही दूर झालेली नाही. विविध घटनांतून ती बाहेर येत असते आणि माणूस जेव्हा हतबल होतो तेव्हा तो अंधश्रद्धेला बळी पडतो. कोरोना काळातही अनेक अंधश्रद्धा वाºयासारख्या पसरत आहेत. राजकीय मंडळी कोणत्याही घटनेचा फायदा उचलतात त्यात त्यांचे चातुर्य असते. ते दूरगामी विचार करणारे नसल्याने अशा घटनांचा ते नक्की फायदा करुन घेतात. अंधश्रद्धेबद्दल कायदा करुन अशा घटनांना थोडाफार आळा बसत असला तरी रामबाण उपाय म्हणून जनजागृती करणे आवश्यक आहे.
- सुरेंद्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, जिज्ञासा ट्रस्ट

आपल्याकडे चमत्कारांवर विश्वास ठेवला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या घटनेला दुजोरा दिला होता. त्यामुळे लोकांचा विश्वास आणखीनच बसला होता. परंतु त्यांना डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी पत्राद्वारे उत्तर दिले होते. जेव्हा या घटनेमागचे वैज्ञानिक कारण पुढे आले तेव्हा त्या घटनेबद्दल लोकांची मानसीकता बदलली. परंतु आजही आपल्याकडे चमत्काराला प्रोत्साहन दिले जाते. चमत्कारावर विश्वास ठेवणे याचा शिक्षणाशी संबंध नाही. राजकारणी अशा घटनांचा फायदा उचलतात. त्यांनी भूमिका घेतली तर अंधश्रद्धेतून अन्याय, अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जनजागृतीची जास्त गरज आहे.
- वंदना शिंदे, अध्यक्षा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
ठाणे शहर

Web Title: The Corona epidemic is a catalyst for superstition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.