जिल्हा रुग्णालयातील कंट्रोल रूमचा रुग्णांच्या नातेवाईकांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST2021-05-25T04:45:00+5:302021-05-25T04:45:00+5:30
ठाणे : कोरोना झाला म्हटले की, त्या रुग्णाच्या संपर्कात जाण्यास कोणी धजावत नसते. अशावेळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाची ...

जिल्हा रुग्णालयातील कंट्रोल रूमचा रुग्णांच्या नातेवाईकांना आधार
ठाणे : कोरोना झाला म्हटले की, त्या रुग्णाच्या संपर्कात जाण्यास कोणी धजावत नसते. अशावेळी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाची प्रकृती कशी आहे? त्याच्यावर योग्य उपचार सुरू आहेत ना? असे अनेक प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांसमोर उभे राहतात. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराने दाखल असलेल्या रुग्णांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना व्हावी, यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, या ठिकाणी आठजणांची टीम दिवसरात्र कार्यरत आहे.
या कक्षाच्या माध्यमातून रुग्णाची प्रकृती, त्याच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती मिळण्याबरोबरच रुग्णालयातील वॉर्डमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून रुग्णाला पाहतादेखील नातेवाईकांना येत आहे. त्यामुळे आपला रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे पाहून नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत असल्याने जिल्हा रुग्णालयातील नियंत्रण कक्ष रुग्णांच्या नातेवाईकांना आधार वाटू लागला आहे. देशभरासह महारष्ट्र राज्यातदेखील मार्च महिन्याच्या अखेरीसापासून कोविड १९ या महामारी आजाराने शिरकाव केला. या महामारी आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणांसह जिल्हा प्रशासन यंत्रणादेखील दिवस-रात्र कार्यरत आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने एप्रिल महिन्यात ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड १९ रुग्णालय म्हणून घोषित केले. त्या दिवसापासून येथे रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्यात कोरोना या आजाराविषयी समाजात असलेल्या भीतीमुळे बाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्यास कोणी जवळचा नातेवाईक, मित्रदेखील धजावत नाही. अशा कठीण प्रसंगात आरोग्य विभागातील डॉक्टरांची टीम व परिचारिका, सफाई कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची योग्य ती काळजी घेतात. तर, दुसरीकडे त्यांची दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती कशी आहे, याची माहिती मिळविण्यासाठी धडपड सुरू असते. ती लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयात नियंत्रण कक्षाची स्थापना केली. या कक्षात सुरुवातीला डॉ. प्रसाद भंडारी, संतोष भोईर व प्रितीश लोगडे यांची नेमणूक केली होती. यावेळी या टीमकडून जिल्ह्यातील सहा महापालिका, ग्रामीण क्षेत्रातील कोविड रुग्णालये यांचे अहवाल तयार करणे, कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंदी ठेवणे, कन्टेनमेंट झोन, लॅब टेस्टिंग आदींचा अहवाल एकत्रित करून त्याचे अहवाल अद्यावत करणे, आदी कामे करण्यात येऊ लागली; मात्र दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागली, तसा कामाचा व्यापही वाढला. त्यानंतर सागर जोशी आणि अनुप नलावडे यांच्यासह बांदेकर, विपुल तोडणकर, स्वाती गरफडे यांचीही नियंत्रण कक्षात नेमणूक करण्यात आली.
ध्वनिक्षेपकाद्वारे साधला जातोय संवाद
मागील दीड वर्षापासून येथून रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांची इत्यंभूत माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे रुग्णावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळू लागली. तसेच नियंत्रण कक्षात असलेल्या ध्वनिक्षेपकामुळे रुग्ण व नातेवाईकांमध्ये संवाददेखील घडवून आणण्याचे काम या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेला नियंत्रण कक्ष रुग्णांच्या नातेवाईकांना आधार वाटू लागला आहे.