ठाण्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST2021-02-25T04:54:47+5:302021-02-25T04:54:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचे प्रमाण कमी होताच, ठाण्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे ...

ठाण्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण निम्म्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाचे प्रमाण कमी होताच, ठाण्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण निम्म्यावर घटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ठाण्यात यापूर्वी एका रुग्णामागे ४० ते ४५ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात होते. मात्र, आता एखाद्या इमारतीत किंवा झोपडपट्टीत रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील एकालाही ट्रेस केले जात नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. महापालिकेकडून हे प्रमाण निम्म्याने कमी झाल्याचे सांगण्यात आले.
ठाण्यात ऑक्टोबरपासून कोरोनाचा धोका कमी झाला होता. त्यामुळे महापालिकेने आपली विलगीकरण केंद्रेही बंद केली. त्यामुळे कोरोना रुग्ण आढळल्यास आता इमारत किंवा झोपडपट्टीचा भागही सील केला जात नाही. विशेष म्हणजे त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोधही बंद झाला आहे. त्यातही एखाद्या ठिकाणी नवीन रुग्ण आढळला, तर त्या भागात फवारणी किंवा महापालिकेचा स्टाफही घरी जाऊन चौकशी करीत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी कळव्यात अशाच एका इमारतीत आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथील रहिवाशांना विचारले असता, महापालिकेचा एकही माणूस येथे फिरकला नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी येथील सहायक आयुक्ताची चांगलीच कानउघाडणी केली होती.
यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिका-यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, यापूर्वी एकामागे ४० ते ४५ जण ट्रेस केले जात होते. परंतु, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणही घटले आहे. सध्या एका रुग्णामागे १० ते १५ जणांना ट्रेस केले जात असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
वास्तविक, तसेदेखील होताना दिसत नसल्याची बाब काही ठाणेकरांशी चर्चा केली असता समोर आली. घोडबंदर भागातील एका इमारतीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. परंतु, त्याच्या संपर्कातील नागरिकांना तर ट्रेस केले गेले नाहीच, शिवाय फवारणीसाठी महापालिकेची यंत्रणा तब्बल चार दिवसांनी पोहोचल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली.
-------
कोरोनाचे एकूण रुग्ण - ६१,३४४
बरे झालेले रुग्ण - ५८,६९८
उपचार सुरू असलेले रुग्ण - १,३२०
कोरोना बळी - १,३२६
----------
आमच्या इमारतीत एक रुग्ण आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, त्याचे कुटुंबीय बाहेर फिरत होते. तसेच त्यांच्या संपर्कातील एकालाही ट्रेस केले नाही.
- संदेश कोकाटे, नागरिक
------------
रुग्ण आढळल्यानंतर आम्ही फवारणीसाठी महापालिकेकडे वारंवार तक्रार केली होती. परंतु, चार दिवसांनंतर आमच्या येथे महापालिकेची यंत्रणा फवारणीसाठी आली. त्यातही रुग्णाच्या संपर्कातील इतर कोणालाही ट्रेस केले नाही.
- लोकेश सावंत, नागरिक
----------
आमच्या येथे रुग्ण आढळल्यानंतर किमान त्याच्या घराचा परिसर सील करणे गरजेचे होते. परंतु, तसेदेखील झाले नाही. मात्र, रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या घरच्यांनाच ट्रेस केले. परंतु, इतरांची माहिती मात्र जमा केली नाही.
रवींद्र घरत, नागरिक
......
कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने, रुग्णांच्या संपर्कात असलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, आता आयुक्तांनी पुन्हा ते वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ही मोहीम पुन्हा सुरू केली आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा