मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे बांधकाम निकृष्ट
By Admin | Updated: May 31, 2016 03:04 IST2016-05-31T03:04:44+5:302016-05-31T03:04:44+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे बांधकाम कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील महापालिकेच्या जागेवर सुरू आहे

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे बांधकाम निकृष्ट
डोंबिवली : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचे बांधकाम कल्याण पश्चिमेतील गांधारी येथील महापालिकेच्या जागेवर सुरू आहे. या उपकेंद्रासाठी महापालिकेने विद्यापीठाला जागा उपलब्ध करून दिली आहे. उपकेंद्राचे बांधकाम निकृष्ट असल्याची तक्रार स्टुडंट अॅक्शन फ्रं ट या विद्यार्थी संघटनेने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांच्याकडे केली आहे.
संघटनेने देशमुख यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. निकृष्ट बांधकाम प्रकरणी चौकशी करून दोषींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्टुडंट अॅक्शन फ्रंटचे प्रमुख प्रा. प्रशांत इंगळे यांनी ही तक्रार केली आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याची कारवाई २००५ सालापासून सुरू आहे. जागा मिळणे, त्याची पाहणी करणे आदींच्या कचाट्यात कल्याण उपकेंद्राचा प्रस्ताव बारगळला होता. २०१० साली उपकेंद्राचे भूमिपूजन तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतरही कामाला सुरुवात झाली नाही. मुंबई विद्यापीठात सिनेट सदस्य असल्यापासून इंगळे त्याचा पाठपुरावा करीत आहेत.
विद्यापीठाने उपकेंद्रासाठी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात एक कोटीची तरतूद केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने माजी नगरसेवक रवी पाटील, सुनील वायले यांनी दोन वर्षांपूर्वी उपोषण केले होते. उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली. पहिला मजला बांधून तयार होत आहे. दरम्यान, हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब इंगळे यांनी निदर्शनास आणून दिली आहे. उपकेंद्राचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी इमारतीला करण्यात येत असलेले प्लास्टर पडत आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यास इमारत मजबूत राहणार नाही. उपकेंद्रात भविष्यात एखादी दुर्घटना घडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)