जनतेचा विश्वासघात करून लादलेल्या महापालिकेच्या करवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार
By धीरज परब | Updated: April 25, 2023 17:50 IST2023-04-25T17:49:32+5:302023-04-25T17:50:49+5:30
काँग्रेस रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल असा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे.

जनतेचा विश्वासघात करून लादलेल्या महापालिकेच्या करवाढी विरोधात रस्त्यावर उतरणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - प्रशासनाने अर्थसंकल्प सादर करण्या आधी झालेल्या काँग्रेस शिष्टमंडळ सोबतच्या बैठकीत कोणतीही करवाढ करणार नसल्याचे आश्वस्त केले होते. मात्र त्या नंतर देखील नियमबाह्यपणे करवाढ करून जनतेचा विश्वासघात केल्याने करवाढ मागे न घेतल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारेल असा इशारा काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, माजी गटनेते जुबेर इनामदार, माजी नगरसेविका मर्लिन डीसा, रुबिना शेख, गीता परदेशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त दिलीप ढोले यांची महापालिका मुख्यालयात भेट घेऊन चर्चा केली व करवाढ रद्द करण्याचे निवेदन दिले. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या उपस्थितीत आयुक्तांची भेट घेतली तेव्हा सर्वसामान्य जनतेवर करवाढ लादली जाणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन आयुक्त म्हणून ढोले यांनी दिले होते असे प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी सांगितले.
कोणत्याही प्रकारची करवाढ न करता अर्थसंकल्प सादर केल्याचे जाहीर करूनही आता नव्याने १०% रस्ता कर, १० ते १५% पाणीपुरवठा लाभ कर, २५ ते ३०% पाणीपट्टी मध्ये करवाढ, अर्धा टक्का अग्निशमन सेवा करवाढ तसेच परिवहन सेवा बस भाड्यात वाढ, अश्या प्रकारचे कर वाढीचे प्रशासकीय निर्णय का व कसे घेण्यात आले ? असा सवाल करीत काँग्रेस ने प्रस्तावित करवाढीला विरोध केला आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करू नका असे आयुक्तांना सांगण्यात आले. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत असून शासनाने शहरासाठी अडीज हजार कोटी दिल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. जर इतका निधी शासनाने कामांसाठी दिला आहे तर मग नागरिकांवर इतक्या मोठ्या प्रमाणात करवाढ कशासाठी ? असा सवाल सामंत यांनी केला.
स्वतः सत्तेत असून एकीकडे करवाढ करायची आणि दुसरीकडे करवाढीचा विरोध करण्याची नौटंकी करायची अशी टीका जुबेर यांनी केली आहे. प्रशासकीय राजवट असताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे अपेक्षित असताना आयुक्तांनी ज्या पध्दतीने करवाढ केली आहे ती अयोग्य असून करवाढीचा निर्णय रद्द करून करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा जनहितार्थ काँग्रेसला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"