सहदुय्यम निबंधक कार्यालयात ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 23:38 IST2021-02-24T23:38:00+5:302021-02-24T23:38:08+5:30
दरम्यान, बोगस दस्तनोंदणी बंद करून नागरिकांची फसवणूक थांबविली नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

सहदुय्यम निबंधक कार्यालयात ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
अंबरनाथ : खोटी कागदपत्रे जोडून सदनिकांची दस्तनोंदणी केली जात असल्याचा आरोप करीत मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टी आणि राष्ट्र कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी चांगलाच गोंधळ घातला. अंबरनाथ सहदुय्यम निबंधक कार्यालयात हा प्रकार घडला. यावेळी रजिस्ट्रेशन कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांसमोरच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात मोडणाऱ्या २७ गावांतील अनेक सदनिकांची दस्तनोंदणी ही बोगस कागदपत्रे जोडून केली जात असून, दुय्यम निबंधकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्याचे पत्र राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महसूल विभागाच्या अपर सचिवांना दिले आहे. तरीदेखील इथे मोठ्या प्रमाणात बोगस रजिस्ट्रेशन केले जात असल्याने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, बोगस दस्तनोंदणी बंद करून नागरिकांची फसवणूक थांबविली नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी सहदुय्यम निबंधकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कॅमेरा पाहून पळ काढला.