येऊरमधील सर्व अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण करा, सौरभ राव यांचे निर्देश

By अजित मांडके | Updated: July 7, 2025 17:29 IST2025-07-07T17:29:18+5:302025-07-07T17:29:33+5:30

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

Conduct a survey of all non-residential, commercial constructions in Yeoor, Saurabh Rao directs | येऊरमधील सर्व अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण करा, सौरभ राव यांचे निर्देश

येऊरमधील सर्व अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण करा, सौरभ राव यांचे निर्देश

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी, व्यावसायिक बांधकामाचे महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामे आहेत. तेथे जेवणावळी, विवाह, पार्टी आदी समारंभ होतात. अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात, ध्वनीवर्धक, बँड, फटाके वाजवले जातात. या सर्व गोष्टी पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टी तातडीने थांबण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी, सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचे सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले आहे.  शहर विकास विभागाने येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिली आहे. या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याचीही पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटीसा पाठविण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. येऊरमध्ये महापालिका, वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे.

टर्फवरील कारवाईचा घेतला आढावा
 

येऊर येथील अनधिकृत टर्फवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी महापालिकेच्या माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्रात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

येऊर येथील १० अनधिकृत टर्फपैकी ०८ टर्फवर कारवाई झाली आहे. दोन टर्फ मालकांनी १० जुलैपर्यंत स्वत:हून टर्फ काढण्याचे मान्य केले आहे. त्यांनी ते न काढल्यास महापालिका त्यावरही कारवाई करणार आहे. या टर्फशिवाय आणखी ०२ अनधिकृत टर्फची माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांनी दिली. त्यापैकी एकावर महापालिकेने अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील विशेष मोहिमेत कारवाई केली आहे. तर, दुसऱ्या टर्फवर तत्काळ कारवाईचे आदेश आयुक्त राव यांनी दिले. 

येऊरसाठी समन्वय समिती स्थापन होणार

येऊर या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात विविध समस्या आहेत. या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी येऊरचे सर्व यंत्रणांमार्फत सुनियोजित व्यवस्थापन व्हावे यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना रोहित जोशी यांनी केली आहे. त्यानुसार, महापालिका, वन विभाग, पोलिस, महसूल, स्वयंसेवी संस्था यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती लवकरच स्थापन करण्यात येईल, असे आयुक्त राव यांनी सांगितले.

Web Title: Conduct a survey of all non-residential, commercial constructions in Yeoor, Saurabh Rao directs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे