जेसीबी दुर्घटना: CM शिंदेंची भेट, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत; राकेशच्या भावाला नोकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 04:14 PM2024-06-23T16:14:49+5:302024-06-23T16:16:05+5:30

CM Eknath Shinde News: या घटनेला जवळपास एक महिना होत आला असून, जेसीबी चालक राकेश यादव यांचा शोध घेण्यास प्रशासनाला यश आलेले नाही.

cm eknath shinde give 50 lakh aid to versova accident victims rakesh yadav family | जेसीबी दुर्घटना: CM शिंदेंची भेट, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत; राकेशच्या भावाला नोकरी 

जेसीबी दुर्घटना: CM शिंदेंची भेट, पीडित कुटुंबाला ५० लाखांची मदत; राकेशच्या भावाला नोकरी 

CM Eknath Shinde News: फाउंटन हॉटेलजवळ वर्सोवा खाडीपाशी झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबीयांस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ५० लाख रुपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला. तसेच राकेश यांच्या भावाला नोकरी देण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्सोवा खाडीजवळील घटनास्थळाला भेट दिली होती. पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच मदतीनिधीची घोषणा केली होती. त्यानुसार, ही मदत करण्यात आली आहे. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच, एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.

राकेश यादव अद्यापही बेपत्ताच

वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम सुरू असताना ५० फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असताना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. या दुर्घटनेला जवळपास २५ दिवस उलटले तरी जेसीबी चालक राकेश यादव बेपत्ता आहे. एमएमआरडीएच्यावतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी १७ दिवस प्रयत्न करूनही तपास होऊ शकला नाही. याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मंडतकार्यासाठी पाचारण करण्यात आले.

राकेश यादव यांच्या भावाला नोकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, वर्सोवा खाडीशेजारी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी घडलेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या राकेश यादव या मजुराच्या कुटुंबियांना आज मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये तर १५ लाख विम्याचे असे एकूण ५० लाखांचा धनादेश राकेश यादव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीए, एल अँड टी,  सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे एकत्रितपणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तत्पूर्वी यादव कुटुंबियांना ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

Web Title: cm eknath shinde give 50 lakh aid to versova accident victims rakesh yadav family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.