यूआरपी मंजूर नसताना क्लस्टरची लगीनघाई का?; ठाणे शहर भाजपाचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 12:49 AM2020-02-04T00:49:01+5:302020-02-04T00:49:56+5:30

उद्घाटनास देवेंद्र फडणवीसांना बोलवा

Cluster logging when URP is not allowed; Thane city BJP objections | यूआरपी मंजूर नसताना क्लस्टरची लगीनघाई का?; ठाणे शहर भाजपाचा आक्षेप

यूआरपी मंजूर नसताना क्लस्टरची लगीनघाई का?; ठाणे शहर भाजपाचा आक्षेप

googlenewsNext

ठाणे : ठाण्यातील क्लस्टर प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. त्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी फडणवीसांचे आभार मानणारे बॅनर लावून समाजमाध्यमांवर पोस्ट टाकल्या. मात्र, आता क्लस्टरच्या भूमिपूजन कार्यक्रमाचेच त्यांना निमंत्रण देण्यास शिवसेना का विसरली, असा सवाल भाजपचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केला. आवश्यक मंजुरी मिळाली नसतानाही क्लस्टर उद्घाटनाची लगीनघाई का, असा प्रश्न करून त्यांनी नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होता कामा नये. अन्यथा, क्लस्टरची एसआरए होईल, अशी टीका सोमवारी केली.

ठाणे शहराध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डावखरे यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजय केळकर, नगरसेवक संदीप लेले, कृष्णा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मढवी आदी उपस्थित होते. क्लस्टरच्या मंजुरीवेळी शिवसेनेने फडणवीस यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावले होते. विद्यमान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेत १८ सप्टेंबर २०१९ रोजी पत्रकार परिषदही घेतली होती. फडणवीस यांनी क्लस्टरला मंजुरी दिल्याने उद्घाटनासाठी त्यांना बोलावलेच पाहिजे. शिवसेनेला श्रेय घ्यायचे, तर त्यांनी घ्यावे. यापूर्वी पालिकेच्या कार्यक्रमांना मान्यवरांना निमंत्रणे वेळेवर दिली होती. या कार्यक्र माला अजून तीन दिवस बाकी आहेत. तोपर्यंत शिवसेनेच्या नेत्यांना सद्बुद्धी येईल, असा टोला त्यांनी लगावला.

क्लस्टरला आयओडीही दिलेली नाही

क्लस्टर प्रकल्पाच्या यूआरपीला (अर्बन रिन्युअल प्लॅन) मंजुरी मिळालेली नसून, अद्याप आयओडी (इंटिमेशन आॅफ डिसअ‍ॅप्रूव्हल) दिलेली नाही. त्यामुळे ई-भूमिपूजनासाठी लगीनघाई का केली जात आहे, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. गावठाणे व कोळीवाडे वगळण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करून भूमिका जाहीर करावी, असे आवाहन
त्यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केवळ आकसापोटी फडणवीस सरकारने घेतलेले अनेक कल्याणकारी निर्णय रोखले. सध्याचे स्थगिती सरकार असून, अशा परिस्थितीत ठाणेकरांचे नशीब बलवत्तर असल्याने क्लस्टरला स्थगिती मिळाली नाही. म्हणून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते क्लस्टरचा उद्घाटन सोहळा होत आहे, असा टोला डावखरे यांनी मारला.

...तर एसआरए होईल : क्लस्टरची अंमलबजावणी संपूर्ण पूर्तता करूनच करावी. अन्यथा, सोन्यासारख्या योजनेची एसआरए होईल, असे भाकीत आमदार संजय केळकर यांनी केले. गावठाणे-कोळीवाड्यांबाबत नागरिक संभ्रमात आहेत. त्यामुळे सरकारने लेखी आश्वासने द्यावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

क्लस्टर हा लाखो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे याला विरोध करणे अयोग्य आहे. क्लस्टरला विरोध म्हणजे भाजपला तो नको आहे का? असा त्याचा अर्थ होतो. जेव्हा क्लस्टर मंजूर झाले, तेव्हा भाजप आमच्यासोबत होते. आता त्यांना क्लस्टर नको कसे, हे त्यांनी सांगावे. क्लस्टर विनामंजूर करणार नाही. त्यातील त्रुटी दूर करूनच कामाला सुरुवात होणार आहे. त्यातही काही त्रुटी असतील तर भाजपने त्या दाखवाव्यात. गावठाण आणि कोळीवाड्यांना यातून आधीच वगळले आहे. कोणावरही जबरदस्ती करून क्लस्टर राबविण्याची आमची इच्छा नाही.
- एकनाथ शिंदे, नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री

Web Title: Cluster logging when URP is not allowed; Thane city BJP objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.