स्विपिंग मशीनद्वारे सफाई
By Admin | Updated: March 20, 2017 01:57 IST2017-03-20T01:57:57+5:302017-03-20T01:57:57+5:30
काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांचा सफाईसाठी केडीएमसी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला गुरुवारच्या स्थायी समितीच्या

स्विपिंग मशीनद्वारे सफाई
कल्याण : काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांचा सफाईसाठी केडीएमसी प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाला गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. दोन पॉवर स्विपींग मशीनद्वारे (यांत्रिक झाडू) केल्या जाणाऱ्या साफसफाईसाठी महापालिका १३ कोटी ६७ लाख ८८ हजार रुपये कंत्राटदाराला देणार आहे. कल्याण व डोंबिवली शहराला प्रत्येकी एक मशीन मिळणार आहे.
महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या साफसफाई करण्यासाठी कामगार वर्ग अपुरा आहे. यामुळे काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांची कंत्राटदाराच्या मार्फत साफसफाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वेळी भाजपाचे सदस्य राहुल दामले यांनी २०१६ च्या फेब्रुवारीत झालेल्या महासभेने हा प्रस्ताव फेटाळला होता, याकडे लक्ष वेधले. महासभेने स्विपींग मशीन खरेदी करण्यास मज्जाव केला होता. कंत्राट देण्यास नाही, अशी माहिती सदस्य राजेश मोरे यांनी दिली. मात्र, यावर संभ्रमावस्था कायम राहिल्याने सभापती रमेश म्हात्रे यांनी संबंधित महासभेचे इतिवृत्ता मागवून घ्या, अशा सूचना सचिव संजय जाधव यांना केल्या. त्यानुसार हा प्रस्ताव काही वेळ स्थगित ठेवण्यात आला. इतिवृत्त उपलब्ध होताच त्याचे वाचन करण्यात आले. यात महासभेने प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे समोर आले.
क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि कंपनीची निविदा मान्य करण्यात आली आहे. कंत्राटदाराला सात वर्षांसाठी साफसफाईचे काम दिले गेले आहे. मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी त्याचीच राहणार आहे. दोन पॉवर स्विपींग मशीनद्वारे केल्या जाणाऱ्या साफसफाईसाठी प्रति शिफ्ट २८ हजार ३०० रुपये महापालिकेकडून कंत्राटदाराला दिले जातील. दिवसा आणि रात्री प्रत्येकी आठ तास हे साफसफाईचे काम चालणार आहे. या कामावर केडीएमसीने देखरेख ठेवावी, अशा सूचना म्हात्रे यांनी प्रशासनाला केली. (प्रतिनिधी)