नियोजन नसल्यानेच शहरे झाली होती ठप्प
By संदीप प्रधान | Updated: August 25, 2025 11:34 IST2025-08-25T11:33:15+5:302025-08-25T11:34:03+5:30
Thane Rain News: पावसाळ्यात किमान दोन ते तीन दिवस असे उजाडतात की, शंभर किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस दोन-चार तासात झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शहरे बुडतात आणि हतबल होतात. लोकांना घरी बसणे बंधनकारक केले जाते. रेल्वेसेवेचा बोजवारा उडतो.

नियोजन नसल्यानेच शहरे झाली होती ठप्प
- संदीप प्रधान
(सहयाेगी संपादक)
पावसाळ्यात किमान दोन ते तीन दिवस असे उजाडतात की, शंभर किंवा त्यापेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस दोन-चार तासात झाल्यावर ठाणे जिल्ह्यातील शहरे बुडतात आणि हतबल होतात. लोकांना घरी बसणे बंधनकारक केले जाते. रेल्वेसेवेचा बोजवारा उडतो. वस्त्यांमध्ये पाणी शिरते व संसार उद्ध्वस्त होतात. अस्मानीबरोबर हे सुलतानी संकटही आहे. शहरांचे नियोजन साफ कोलमडले आहे. सरकारी संस्थांमध्ये संवाद-समन्वयाचा अभाव आहे.
श्रावणात आषाढासारखा पाऊस सोमवार, मंगळवारी कोसळला. अर्थात दिवसभरात १०० मिमी. पाऊस होत असेल तर त्याला तोंड देण्याकरिता खरेतर आपण सज्ज असायला हवे. परंतु, या आघाडीवर आपली वाटचाल ही उलट दिशेने सुरू आहे. एकेकाळी ठाण्यात पावसाचे पाणी मुरण्याकरिता माती असलेली मोकळी जागा मुबलक होती. आता इंचन इंच जमीन सिमेंट काँक्रीटने बांधून काढण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ठाण्यात पुनर्विकासाला भरती आल्याने टॉवर उभे राहात आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचा त्रास होऊ नये, याकरिता रस्ते काँक्रिटीकरणाची मोहीम सुरू आहे. काही प्रमुख रस्ते काँक्रिटचे केले. तरीही ठाण्यातील खड्ड्यांचे ओंगळवाणे चित्र झाकणे शक्य झालेले नाही.
घोडबंदर रोड आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. त्यात दुचाकीस्वार जखमी झाले किंवा मरण पावले. घोडबंदर रोडच्या एका बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, तर दुसऱ्या बाजूला खाडी आहे. डोंगरातून येणारे पाणी येथे दुभाजक व अन्य बांधकामांमुळे अडते व पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. घोडबंदर रोडवर मुख्य रस्ते व सेवा रस्ते एकमेकांना जोडण्यात येत आहेत. नव्या नाल्यांची कामे होण्यापूर्वीच काही नाले बुजवले.
ठाण्यातील घोडबंदर असो की, शिळफाटा सर्वत्र बिल्डरांचे प्रकल्प उभे राहात आहेत. अनेक बिल्डर आपल्या सोयीनुसार बांधकाम करतात. नाल्याचे प्रवाह वळवतात. लोक घरे घेतात व आपण किती पाण्यात आहोत, याचे पितळ अशा अतिवृष्टीच्या वेळी उघडे पडते. ठाणे व परिसरात मेट्रो, उड्डाणपूल, ठाणे-बोरिवली टनेल प्रकल्प, स्मार्ट सिटी असे असंख्य प्रकल्प सुरू आहेत. एमएमआरडीए काय करतेय ते महापालिकेला ठाऊक नाही आणि रस्ते विकास महामंडळाच्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ आहे. अंधेर नगरी चौपट राजा कारभार सुरू आहे. माध्यमांनी कितीही बोंब मारली तरी आमचे काही बिघडत नाही. आम्ही आमच्या व्होटबँकेवर निवडून येतो. त्यामुळे आम्हाला कशाचे भय नाही, अशीच लोकप्रतिनिधींची भावना आहे.
मध्य रेल्वेची हतबलता
मध्य रेल्वेची वाहतूक मुंबईच्या दिशेला मंगळवारी झाली नाही. रेल्वेने शटल सेवा चालवली. २६ जुलै २००५नंतर परवा तो प्रयोग केला. प्रवासी संघटना शटल सेवा चालवण्याची मागणी करतात. मात्र, ठाणे स्थानकात लोकल उभी करून पुन्हा कल्याणला सोडण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मुंब्रा ते ठाणे अंतर कापायला दोन ते अडीच तास लागले. देशाच्या आर्थिक राजधानीलगतच्या शहरांत वाहतुकीची ही दारुण स्थिती आहे.