बालकामगार घटले, पण किशोरवयीन कामगार वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 01:38 AM2019-05-02T01:38:49+5:302019-05-02T01:39:43+5:30

दोन वर्षांत ६८ छापे : १०७ किशोरवयीन कामगारांची सुटका, ३६ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल

Child labor decreased, but teenage workers increased | बालकामगार घटले, पण किशोरवयीन कामगार वाढले

बालकामगार घटले, पण किशोरवयीन कामगार वाढले

Next

पंकज रोडेकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यात बालकामगारांची संख्या घटल्याची बाब शासकीय आकडेवारीवरून उघड होत असली, तरी १५ ते १८ या किशोरवयीन वयोगटांतील मुलांची संख्या मात्र जास्त असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत टाकलेल्या धाडसत्रांत किशोरवयीन १०७ मुलांची सुटका करण्यात ठाणे कामगार उपायुक्त कार्यालयाला यश आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत ३६ मालकांविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी बुधवारी, कामगार दिनानिमित्त दिली.

ठाणे जिल्हा हा ग्रामीण आणि शहरी असा विखुरला आहे. जिल्ह्यात औद्योगिक पट्टाही मोठा आहे. याठिकाणी मध्यंतरी कामगारवर्ग मिळत नसल्याने कमी पैशांमध्ये कामासाठी बालकामगारांना ठेवण्यात येत होते. त्यातच, बालकामगार अधिनियम १९८६ अंतर्गत १८ व्यवसाय आणि ६५ प्रक्रिया उद्योगांमध्ये १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे नियमबाह्य आहे. अशा ठिकाणी कामगार उपायुक्त विभागामार्फत लक्ष ठेवले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या आस्थापनांची आकस्मिक पाहणी करणे, छापे टाकणे अशा कारवाया वेळोवेळी केल्या जातात. कुठे बालकामगार कामाला असल्याची एखादी तक्रार आल्यास त्या तक्रारीवर तातडीने कारवाईही केली जाते. अशा प्रकारे ठाणे कामगार उपायुक्त व्ही.एस. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत झापू, पोलीस आणि सामाजिक संस्था (एनजीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ६८ ठिकाणी छापे टाकण्यात आले.

वेगवेगळ्या छाप्यांमध्ये त्या ठिकाणाहून १०७ मुलांची सुटका करण्यात आली होती. यामध्ये १४ वर्षांखालील, म्हणजे ज्याला बालकामगार संबोधले जाते, अशा २३ मुलांचा समावेश आहे. उर्वरित ८४ मुले ही १५ ते १८ या वयोगटांतील असून त्यांना किशोरवयीन संबोधले जाते. त्यांना कामावर ठेवणाऱ्या ३६ मालकांविरोधात एफआयआर दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बालकामगार मुख्यत्वे परराज्यांतीलच
आजवर टाकलेल्या छाप्यांमध्ये राज्यातील एकही बालकामगार आढळून आलेला नाही. जे आढळून आले, ते सर्व परराज्यांतीलच आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यांतील बालकामगार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तीन महिन्यांत साडेपाचशे आस्थापनांना भेटी

कामगार उपायुक्त कार्यालयामार्फत २०१८ च्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांत केलेल्या १७ धाडसत्रांदरम्यान जवळपास ५५० वेगवेगळ्या आस्थापनांची पाहणी केली होती. नोव्हेंबर महिन्यात टाकलेल्या १० धाडसत्रांत ३६६ आस्थापनांची पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हॉटेल आणि गॅरेजमध्ये आढळले बालकामगार
ठाणे जिल्ह्यात टाकलेल्या धाडसत्रांत कळवा, मुंब्रा, कल्याण आणि टिटवाळा येथील केलेल्या कारवाईत प्रामुख्याने बालकामगार हे गॅरेज आणि छोट्यामोठ्या हॉटेलमध्ये राबताना दिसून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Child labor decreased, but teenage workers increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.