भाईंदरच्या तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू प्रकरण: पोलीस व महापालिका आयुक्तांना नोटीस
By धीरज परब | Updated: June 10, 2025 17:13 IST2025-06-10T17:11:57+5:302025-06-10T17:13:25+5:30
राज्य मानवी हक्क आयोगाची कारवाई

भाईंदरच्या तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू प्रकरण: पोलीस व महापालिका आयुक्तांना नोटीस
धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: भाईंदरच्या स्व. गोपीनाथ मुंडे महापालिका क्रीडा संकुलातील तरणतलाव मध्ये १० वर्षांच्या ग्रंथ मुथा ह्या मुलाचा बुडून मृत्यू प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाने मीरा भाईंदर महापालिका आयुक्त आणि मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त यांना नोटीस बजावत ८ आठवड्यात कार्यवाहीचा संपूर्ण अहवाल स्वतः उपस्थित राहून सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट जवळ असलेले महापालिकेचे क्रीडा संकुलच्या तरणतलावात २० एप्रिल रोजी ग्रंथ हा तरण तलावात पोहताना बुडून मरण पावला होता. सदर संकुल पालिकेने साहस चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस चालवण्यास दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र भाजपाशी संबंधित उपठेकेदार संकुल चालवत असल्याचे लेखी व तोंडी आरोप झाले आहेत.
ग्रंथ याच्या मृत्यूच्या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊन नवघर पोलीस ठाण्यावर निषेध फेरी काढली होती. तर नवघर पोलिसांनी ठेकेदार, व्यवस्थापन वर्ग व ४ प्रशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल केला. पालिका आयुक्तांनी देखील तिघा अधिकाऱ्यांची समिती बनवून त्याचा अहवाल सादर झाला आहे. मात्र कार्यवाही अजून झाली नाही.
शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने ग्रंथच्या वडिलांसह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांची भेट घेऊन स्थानिक नेत्याच्या जवळील भाजपाच्या माजी पदाधिकारीचा संकुलात वावर असल्याचे सांगत त्याचा तपास तसेच आर्थिक व्यवहार तपासून आरोपी करण्याची आणि शिक्षेची मागणी केली होती.
तर सत्यकाम फाऊंडेशनचे ऍड . कृष्णा गुप्ता यांनी महापालिका आणि पोलीस काटेकोर तपास करण्यासह ठोस कार्यवाही करत नसल्याने राज्य मानवी हक्क आयोगा कडे तक्रार केली होती. आयोगाने त्याची दखल घेत पोलीस आणि पालिका आयुक्तांना नोटीस बजावून अहवाला सह स्वतः १९ ऑगस्ट रोजीच्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.