मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 06:19 IST2025-11-04T06:17:55+5:302025-11-04T06:19:50+5:30
रुग्णालयातील प्रसूती विभागात गर्भवतींचे होणारे हाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार यावरून कारवाई

मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूती विभागात गर्भवतींचे होणारे हाल, रुग्णालयाचा भोंगळ कारभार याचा ‘लोकमत’ने सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. प्रशासनाने याची दखल घेऊन रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी आता डॉ. स्वप्नाली कदम यांची नियुक्ती केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
प्रसूती विभागात जेमतेम २५ बेड उपलब्ध असून, तेथे ३२ महिला प्रसूतीकरिता दाखल असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट दिली. मागील दोन महिन्यांत रुग्णालयाने ७८ महिलांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात धाडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. येथे नूतनीकरण करताना ऑक्सिजन लाइन टाकण्याची निविदाच काढली नसल्याचे उघड झाले. या वृत्त मालिकेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी आयुक्तांकडे खुलासा मागवला. महिलांना चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना केल्या. आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागासह कळवा रुग्णालय प्रशासनाची बैठक घेऊन येथील बेड वाढविण्याचे निश्चित केले. तसेच कामात हलगर्जी करणारे रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. माळगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. डॉ. बारोट यांच्याकडील रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्यांच्या जागी आता डॉ. कदम यांची नियुक्ती केली. कदम शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख आहेत. डॉ. माळगावकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.