- अनिकेत घमंडी, डोंबिवलीआमदार रवींद्र चव्हाण यांची केडीएमसी निवडणुकीत भाजपाच्या प्रचारप्रमुखपदी मुख्यमंत्र्यांनी नेमणूक केली. यामुळे चव्हाण यांचा भाव काहीसा वधारला असला तरीही कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांना डावलल्याचीही चर्चा आहे. २७ गावांमुळे पवार चर्चेत आले असले तरी त्यांनी विरोधकही तेवढेच निर्माण केल्याने त्यातल्या त्यात सोबर चेहरा असलेले चव्हाण यांना ते पद देऊन पक्षश्रेष्ठींनी दुहेरी खेळी केली आहे. सकृतदर्शनी जरी हे पद देऊन चव्हाणांना महत्व दिले असे वाटत असले तरीही यामुळे त्यांची जबाबदारी वाढली असून यात जर ते फेल झाले, तर मात्र त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. एकीकडे खासदार कपिल पाटील यांना विभागाध्यक्ष, पवार यांना प्रदेश सचिव अशा विविध जबाबदाऱ्या देताना चव्हाण यांना मात्र डावलण्यात आले आहे का, अशीही चर्चा सर्वत्र होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या शनिवारच्या घोषणेमुळे त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. युतीचा निर्णय जरी पक्षश्रेष्ठी घेणार असले तरीही सध्याच्या वातावरणात केडीएमसीत युती होऊच नये, अशी भूमिका दोन्ही पक्षांची आहे. एरव्ही, युती झाल्यावर विशेषत: महापालिका निवडणुकीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाला नामोहरम करण्यासाठी बंडखोर, अपक्ष उभे करून भाजपाच्या उमेदवारांचे खच्चीकरण करून त्यांस पाडतात, असा सूर भाजपाने आळवला आहे. त्यातच, २७ गावांसंदर्भात शिवसेनेविरुद्धच भूमिका घ्यायची, असा पवित्रा पवार यांनी घेतला होता. त्यात चव्हाण मात्र बाजूला होते. अशातच खासदारकीच्या निवडणुकीत शिंदेंसाठी चव्हाण यांनी दिवसरात्र एक केली होती. त्याचे फळ त्यांना विधानसभेत मिळाले. त्यामुळे जर युती झालीच तर समन्वय साधणारा आणि सेनेकडूनही त्यास तेवढाच प्रतिसाद मिळण्याची शक्यता अधिक असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. २७ गावांमधील त्या ४९९ कर्मचाऱ्यांना केडीएमसीत घेण्यासाठी चव्हाण यांनीच सर्वपक्षीयांना एकत्र केले होते. जर युती झाली नाही तरी शिवसेनेची गळचेपी कुठे करायची, त्यांना कुठे दाबायचे, त्यांच्या उमेदवारांची कशी कोंडी करायची, याचीही गणित-सूत्रे चव्हाण यांना चांगली जमतील. पवार यांच्यापेक्षा चव्हाण हा कोकणी चेहरा असून त्यांचा या निवडणुकीत पक्षाला जास्त फायदा होऊ शकतो, असे श्रेष्ठींना वाटते. विधानसभेत त्यांनी डोंबिवलीतून शिवसेनेच्या पॉकेट्समधूनही मते काढली. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या मतांना उमेदवाराच्या निवासालगतही त्यांनी खिंडार पाडले होते. 1कोकणी, गुजराती, आगरी, ब्राह्मण, यूपी, याखेरीज समाजातील अन्य नागरिकांना त्यांच्याबाबत जास्त जवळीकता आहे. त्या सर्वांना एकत्रित करण्यात त्यांची हातोटी आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह कल्याणात आले होते, तेव्हा सभेला गर्दी मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची दाद एकनाथ शिंदेंनी दिली होती. खासदार श्रीकांत शिंदे जेव्हा निवडून आले, तेव्हा पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम चव्हाण यांचे अभिनंदन करून आलिंगन दिले होेते. 2दुसरीकडे मनसेलाही ते जवळचे असून कल्याण जिल्हाध्यक्ष राजू पाटील, नेते राजन मराठे, राजेश कदम यांच्याशीही त्यांचे सलगीचे संबंध आहेत. काँग्रेसचे नेते शिवाजी शेलार हे त्यांचे मित्र आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नितीन पाटील, विकास म्हात्रे, रणजित जोशी आदींना फोडून भाजपात आणण्यातही त्यांची खेळी मोलाची आहे.
चव्हाणांना वधारले पवारांना डावलले
By admin | Updated: September 19, 2015 23:33 IST