चरस तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून अटक : एक लाखाचा चरस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 21:35 IST2018-10-31T21:29:55+5:302018-10-31T21:35:18+5:30
चरस तस्करी करणा-यांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे. मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून समशदअली सय्यद याच्याकडून सुमारे एक लाखांचा चरस हस्तगत करुन त्याला अटक केली.

ठाणे पोलिसांची सलग दुस-या दिवशी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : चरस या अमली पदार्थाची तस्करी करणा-या समशदअली सय्यद (रा. झाशी) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मंगळवारी रात्री अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाखाचा चरस हस्तगत केला असून त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ठाणे रेल्वेस्थानक परिसरात एक व्यक्ती चरसतस्करीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली खैरनार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, उपनिरीक्षक धर्मराज बांगर आदींच्या पथकाने ठाणे रेल्वेस्थानक परिसरात सापळा रचून सय्यदला ३० आॅक्टोबर रोजी अटक केली. त्याच्याकडून एक लाखाचा अर्धा किलो चरस जप्त केला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सय्यदचे आणखी कोणकोण साथीदार आहेत? त्याने चरस कोणाकडून आणला होता? आदी सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.