भिवंडीतील गुंदवली ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे बिनविरोध
By नितीन पंडित | Updated: February 13, 2023 17:28 IST2023-02-13T17:27:50+5:302023-02-13T17:28:11+5:30
गोदाम पट्ट्यामुळे विकसित असलेल्या गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा वचन म्हात्रे यांची रविवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भिवंडीतील गुंदवली ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे बिनविरोध
भिवंडी- गोदाम पट्ट्यामुळे विकसित असलेल्या गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा वचन म्हात्रे यांची रविवारी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतच्या सरपंच उमाबाई आत्माराम म्हात्रे यांनी आपसात ठरल्याप्रमाणे त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी रविवारी गुंदवली ग्रामपंचायत सभागृहात भिवंडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी इंद्रजीत काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी चंद्रभागा म्हात्रे यांचा सरपंच पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी इंद्रजीत काळे यांनी चंद्रभागा म्हात्रे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर केली. चंद्रभागा म्हात्रे यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यावेळी चंद्रभागा म्हात्रे यांना शुभेच्छा देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष डि के म्हात्रे, ग्रामपंचायत गुंदवलीचे माजी उपसरपंच सुमित म्हात्रे,उपसरपंच प्रमोद म्हात्रे, माजी सरपंच मनेष म्हात्रे, यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान वरिष्ठांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडणार असून ग्राम विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच चंद्रभागा म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.