कॅब चालकांनी गेल्या तीन दिवसांपासून भाडेवाढीसाठी संप पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील मुंब्रा परिसरातून धक्कादायक प्रकार समोर आला. एका व्यक्तीने कॅब चालकांना संप मागे घेण्यासाठी बंदूक दाखवून संप मागे घेण्यासाठी दबाब टाकण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार चालकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील वाय-जंक्शनवर दुपारच्या सुमारास कारमधून आलेल्या कॅब चालकांना संप मागे घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्याने कॅप चालकाला बंदूक दाखवून धमकी दिली, असा आरोप आंदोलकांनी केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती पांढऱ्या कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याच्या बाजूच्या सीटवर बंदूक दिसत आहे. कॅब चालकांनी त्याचा व्हिडीओ काढायला सुरुवात केली त्याने बंदूक लपवण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाचे म्हणजे, आंदोलकांना धमकी देणारा व्यक्ती देखील कॅब चालक आहे. मात्र, त्याने आंदोलकांना पाठिंबा देण्याऐवजी विरोध का दर्शवला? तसेच कोणाच्या सांगण्यावरून त्याने कॅब चालकांना संप मागे घेण्यासाठी धमकी दिली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.