मोटारींना धडक देत बस घुसली इमारतीच्या आवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:18 IST2019-08-10T00:17:52+5:302019-08-10T00:18:03+5:30
कल्याणची घटना : जीवितहानी टळली

मोटारींना धडक देत बस घुसली इमारतीच्या आवारात
कल्याण : पश्चिमेतील बिर्ला कॉलेज रोडवरील कोकणरत्न हॉटेलजवळ ‘मोहन पार्क’च्या मिनीबसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने रस्त्यालगतच्या दोन मोटारींना धडक दिली. या अपघातात बस मोटारीला धडक देत पदपथ तोडून येथील संकेश्वर कृपा इमारतीच्या आवारात घुसली. बसमध्ये चार ते पाच प्रवासी होते. परंतु, सुदैवाने बस अपघातात कलंडली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे.
हा अपघात शुक्रवारी सकाळी ७.४५ च्या दरम्यान घडला. सकाळच्या सुमारास याठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी असते. शाळेत जाण्याची वेळ असल्याने विद्यार्थी रस्त्यावर उभे असतात तसेच कामावर जाणारे चाकरमानी रिक्षासाठी उभे असतात. भविष्यात असा अपघात घडू नये, म्हणून येथील रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याची मागणी येथील स्थानिक रहिवासी करत आहेत.