‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 01:50 AM2019-10-31T01:50:28+5:302019-10-31T06:25:36+5:30

वन्यप्रेमी विरुद्ध सरकार वाद पेटण्याची शक्यता

Bulldozer on 131 acre forest for 'Sun' pipeline; After the 'Aarey' there will be a big tree again | ‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

‘सूर्या’च्या पाइपलाइनसाठी १३१ एकर वनावर बुलडोझर; 'आरे'नंतर पुन्हा मोठी वृक्षतोड होणार

Next

नारायण जाधव

ठाणे : मेट्रो ३ च्या कारशेडसाठी मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत असताना आता एमएमआरडीएच्या मीरा-भार्इंदर आणि वसई-विरार महापालिकेसह २७ गावांची तहान भागविण्यासाठीच्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील तब्बल १३१.५७ एकर जंगलांचा गळा घोटला जाणार आहे. यात १६ एकरहून अधिक जमीन संजय गांधी राष्ट्रीय कार्यक्षेत्रातील आहे. यामुळे आगामी काळात वन्यपे्रमी विरुद्ध एमएमआरडीए आणि सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा उभा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीवर बांधलेल्या धरणातून वसई-विरार महापलिकेसह परिसरातील २७ गावे आणि ठाणे जिल्ह्यांतील मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरडीएने अडीच हजार कोटी रुपये खर्र्चून पाणीपुरवठा हाती घेतला आहे. नगरविकास विभागाने अलीकडेच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे अधिकार एमएमआरडीएला प्रदान केले आहेत. त्यानंतर आता शासनाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तब्बल १३१.५७ एकर वनजमीन या प्रकल्पांसाठी देण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात खारफुटीचाही समावेश आहे.

८० एकर राखीव तर ४२ एकर संरक्षित वनांचा जाणार बळी
विशेष यात ७९.६८ एकर राखीव वनजमीन तर ४१.७४ संरक्षित वनांचा समावेश आहे. तर ९.३ एकर जमिनीवर खासगी वने आहेत. राखीव वनांमध्ये १६ एकराहून अधिक परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आहे.

मीरा-भाईंदर मनपाने वनपट्ट्यांना पोहोचली होती हानी
मीरा-भाईंदर महापालिकेने यापूर्वीच पाइपलाइन टाकण्यासाठी संजय गांधी उद्यानातील संरक्षित वनपट्ट्यांवर अतिक्रमण केले
होते. त्यामुळे ०.३९ हेक्टर जमिनीवरील वृक्षवेलींची नियमबाह्य कत्तल करून समांतर जलवाहिनी टाकल्याप्रकरणी मीरा-भाईंदरचे तत्कालीन आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत येऊरच्या परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी एप्रिल २०१५ मध्ये अहवाल पाठवूनही ठाणे आणि बोरीवली येथील मुख्य वनसंरक्षकांनी त्याबाबत अद्यापही कारवाई केली नसल्याचे उघड झाले आहे.

ही कामे करणार
या वनजमिनीतून पाइपलाइनसह लगतचे रस्ते, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, बोगद्यांसह तत्सम कामे करण्यात येणार आहेत. यामुळे वनांमधून मोठ्या प्रमाणात दुर्मीळ वृक्षांची कत्तल होऊन अवजड वाहनांची वाहतूक वाढून वन्यजीवांना धोका पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडवरून ज्याप्रमाणे वाद पेटला तसा या कामादरम्यान पेटण्याची शक्यता आहे.

Web Title: Bulldozer on 131 acre forest for 'Sun' pipeline; After the 'Aarey' there will be a big tree again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.