The budget of housewives spoiled by pepper | मिरचीने बिघडवले गृहिणींचे बजेट; लाल मिरची लागली झोंबायला

मिरचीने बिघडवले गृहिणींचे बजेट; लाल मिरची लागली झोंबायला

- राहुल वाडेकर

विक्रमगड : उन्हाळा सुरू झाला म्हणजे ग्रामीण भागातील गृहिणींना काळजी लागते ती घरातील मसाला-हळद, कांदा-लसूण-खोबऱ्याच्या साठवणुकीची. त्यातच ग्रामीण भागातील महिला वर्षभर पुरेल एवढा मसाला व हळदीची साठवणूक करून ठेवत असतात. मात्र, यावर्षी सर्वच पदार्थांची भाववाढ झाली आहे. त्यात मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. 

मसाला करण्यासाठी लागणाऱ्या सुकलेल्या लाल मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. दोन वर्षापूर्वी १२० रुपये किलो दराने विकली जाणारी तिखट मिरची यावर्षी दुप्पट भावाने विकली जात आहे. महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मध्य प्रदेशमधून लाल मिरची येत असते. असे असले तरी महागाई वाढत असल्याने यात मसाल्याचे पदार्थही सुटले नसून, त्याचीही भाववाढ झाली आहे. या मिरचीचे भाव महिलांसाठी तिखट बनू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गृहिणींचे बजेट बिघडले आहे.    

वर्षभरासाठी लागतो ८-१२ किलो मसाला 
दोन वर्षापूर्वी या सर्व मिरच्यांचे भाव १०० ते १२० रुपयांनी वाढले असल्याचे महिलांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रत्येक घरी वर्षाकाठी  सरासरी ८ ते १२ किलो मसाला बनवला जातो. 
त्यामुळे ग्रामीण भागातील महिला या मोठ्या प्रमाणात सुकलेली लाल मिरची खरेदी करतात. यावर्षी सुकलेल्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे महिलांनी सांगितले.

विक्रमगड बाजारातील मिरचीचे भाव
तिखट असलेली लवंगी मिरची १८० रुपये किलो, कमी तिखट असलेली पांडी मिरची २२० रुपये किलो, मसाल्याला लाल रंग येण्यासाठी  वापरण्यात येणारी काश्मिरी मिरची ३८० रुपये किलो, शंकेश्वरी मिरची २८० रुपये किलो, तर रस्सा जाड होण्यासाठी मसाल्यामध्ये टाकण्यात येत असलेली बेडगी मिरची ३२० ते ३५० रुपये किलो, रेशम पट्टा  मिरची ३८० ते ४३० रुपये किलो दराने सध्या व्यापारी विकत असल्याची माहिती विक्रमगडमधील व्यापाऱ्यांनी दिली.    

मिरचीचा बाजारभाव (प्रतिकिलो)
लवंगी मिरची १८० रुपये
पांडी मिरची २२० रुपये
काश्मिरी मिरची ३८० रुपये
शंकेश्वरी मिरची २८० रुपये
बेडगी मिरची ३२० ते ३५० रुपये
रेशम पट्टा मिरची ३८० ते ४३० रुपये

Web Title: The budget of housewives spoiled by pepper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.