ब्रेक जाम झाला अन् लोकल सव्वा तास थांबली; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 13:45 IST2021-06-16T13:45:16+5:302021-06-16T13:45:53+5:30
Mumbai local : मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी कर्जत लोकल सकाळी 11.4 मिनिटांनी वांगणी रेल्वे स्थानकात आली.

ब्रेक जाम झाला अन् लोकल सव्वा तास थांबली; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना
बदलापूर : मुंबईहून कर्जतच्या दिशेने निघालेली लोकल गाडी वांगणी रेल्वे स्थानकात बंद पडल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी ही लोकल वांगणी रेल्वे स्थानकात आली होती. त्या लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून सव्वा तासानंतर ही लोकल कर्जतच्या दिशेने रवाना करण्यात आली.
मुंबईहून कर्जतच्या दिशेने जाणारी कर्जत लोकल सकाळी 11.4 मिनिटांनी वांगणी रेल्वे स्थानकात आली. रेल्वे स्थानकात थांबा घेतल्यानंतर त्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि त्यामुळे ती लोकल स्थानकातच बंद पडली. या लोकलचा ब्रेक जाम झाल्यामुळे ती गाडी स्थानकात थांबविण्यात आली होती.
तब्बल सव्वा तास ही लोकल स्थानकात थांबविण्यात आली. यावेळी रेल्वेच्या अभियंत्यांनी ती लोकल सुरू करण्याचा प्रयत्न केला. दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटानंतर ही लोकल कर्जतच्या दिशेने रवाना करण्यात आली. या दरम्यान कर्जत आणि पुण्याच्या दिशेने एकही लोकल आणि एक्सप्रेस गाडी जाऊ शकले नाही.