अंबरनाथ: अंबरनाथ येथील शंकर हाईट फेस टू या इमारतीमध्ये भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करत त्याला जबर जखमी केले आहे. सुदैवाने स्थानिक रहिवाशांनी कुत्र्यांना हुसकावून लावल्याने या मुलाचा जीव वाचला. (A boy seriously injured in attack by stray dogs in Ambernath)
अंबरनाथ पश्चिम भागातील शंकर हाईट या इमारतीत सुमेध प्रफुल्ल लोहार हा चार वर्षाचा चिमुकला आपल्या सहकारी मित्रांसोबत इमारतीच्या आवारात खेळत असताना तीन ते चार कुत्र्यांनी अचानक सुमेधवर हल्ला केला. सुमेध याने कुत्र्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यांपासून बचाव करताना सुमेध जमिनीवर पडल्याने त्याच वेळी या भटक्या कुत्र्यांनी सुमितला पाठीवर चावा घेत गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच याच परिसरात असलेल्या नागरिकांनी कुत्र्यांच्या दिशेने धाव घेतल्याने कुत्रे पळून गेले. मात्र कुत्र्यांच्या या हल्ल्यात सुमितच्या पाठीवर प्रचंड दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या समस्येने तोंड वर काढले आहे.