भिवंडीत बापाची हत्या करणा-या मुलास भार्इंदरमध्ये अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:41 IST2018-01-02T21:50:49+5:302018-01-02T22:41:14+5:30
बापाचे व मुलाचे शेतीच्या कामावरून भांडण झाले होते. दोघांत झालेले भांडण विकोपाला जाऊन फरशीने धर्मा धिंडाच्या पाठीत देखील वार केले.

भिवंडीत बापाची हत्या करणा-या मुलास भार्इंदरमध्ये अटक
भिवंडी : फरशीच्या वाराने बापाची हत्या करणा-या मुलास पोलिसांनी मंगळवार रोजी भार्इंदर उत्तन येथील होडीवर पकडले. बापाचे व मुलाचे शेतीच्या कामावरून भांडण झाले होते, त्यामधून बापाची हत्या मुलाने केली होती. तालुक्यातील पाये गावात मृत धर्मा शंकर धिंडा (७०) हा आपल्या भाताच्या खळ्यावर मळणीचे करीत होता. त्यावेळी तेथे बसलेला मुलगा सुरेश यांस मळणीच्या कामात मदत करण्यास सांगितले. परंतु त्याने बापाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. याचा राग मनात धरून धर्मा याने मुलगा सुरेश यांस घराबाहेर हाकलून दिले. यावरून दोघांत झालेले भांडण विकोपाला जाऊन सुरेश याने तेथे असलेली फरशी धर्माच्या डोक्यात फेकून मारली. तसेच त्याच फरशीने धर्माच्या पाठीत देखील वार केले. फरशीच्या माराने धर्मा गंभीररीत्या जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सुरेश धिंडा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाये गावात घडलेल्या घटनेनंतर सुरेश धिंडा याने पाये गावातील घटना स्थळावरून पळ काढला. तो वसईमार्गे थेट भार्इंदर येथील उत्तन-पाली येथे गेला. आपणांस कोणीही ओळखू नये म्हणून त्याने होडीवर खलाशाचे काम सुरू केले. याची माहिती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्यास पकडले.