आज उधार; उद्या रोख
By Admin | Updated: November 10, 2016 03:22 IST2016-11-10T03:22:03+5:302016-11-10T03:22:03+5:30
आज रोख अन् उद्या उधार’ हा फलक अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळतो. उधारीवर खरेदीचा ‘उद्या’ हा कधीच उगवणार नसतो. मात्र, संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱ्या

आज उधार; उद्या रोख
ठाणे : ‘आज रोख अन् उद्या उधार’ हा फलक अनेक दुकानांमध्ये पाहायला मिळतो. उधारीवर खरेदीचा ‘उद्या’ हा कधीच उगवणार नसतो. मात्र, संपूर्ण देशाला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बड्या चलनी नोटा रद्द करून ‘आज उधार अन् उद्या रोख’, असा सुखद अनुभव ठाणेकरांच्या कुंडलीत लिहिला.
नोटा रद्द झाल्यानंतर एटीएममध्ये खडखडाट होईपर्यंत ठाणेकरांनी पैसे काढले. त्यामुळे बुधवारी सकाळी ठाणेकर दूध, अंडी, ब्रेड असे जिन्नस घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी रद्द झालेली पाचशेची नोट शहाजोगपणे दुकानदारापुढे धरली. एरव्ही, बोहनीच्या वेळी पैसे विसरलो, असे सांगणाऱ्याकडे तुच्छतापूर्वक कटाक्ष टाकणाऱ्या दुकानदाराने हसतहसत ती पाचशेची नोट परत केली. सुटे असतील तर द्या, अन्यथा तुम्ही आपले नेहमीचे गिऱ्हाईक आहात. उद्या पैसे दिले तरी चालतील, असे सांगितले. मेडिकल दुकानांमध्ये रद्द नोटा चालवता येणार असल्याने ठाणेकरांनी तेथे एण्ट्री केली आणि किरकोळ जिन्नस खरेदी करून पाचशेची नोट पुढे केली. मेडिकल दुकानवाला म्हणाला की, साहेब माझ्याकडे सुटे नाहीत. एकतर, तुमची ही रक्कम जमा करून घेतो. जेव्हा यायचे तेव्हा येऊन औषधे किंवा लागेल ते खरेदी करा. अन्यथा, तुम्ही आपले नेहमीचे गिऱ्हाईक आहात. पैसे काय पळून जाणार आहेत. नंतर, द्या.
ठाणेकरांनी मग भाजी-फळबाजार गाठला. तेथे दोन-तीन भाज्या किंवा दोन प्रकारचे फळफळावळ खरेदी करून पाचशेची नोट सुटी करण्याची चलाखी करून पाहिली, तर भाजीवाला म्हणाला की, साहेब मीच आज उधारीवर भाजी घेऊन आलोय. तुम्हीही तशीच घेऊन जा. उधारीची सवय नसल्याने लाजलेल्या काही ठाणेकरांनी भाजी तशीच खाली ठेवून काढता पाय घेतला, तर काहींनी पोटाला लागेल तेवढी भाजी उधारीवर नेली.