भिवंडीतील खालिंग येथे आढळली बॉम्बसदृश वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:44 IST2019-06-13T00:41:16+5:302019-06-13T00:44:23+5:30
खालिंग बुद्रुक येथील शांताराम पितांबरे यांना पहाटे चार वाजता घराच्या पायरीवर एक बॅटरी संच आढळून आला

भिवंडीतील खालिंग येथे आढळली बॉम्बसदृश वस्तू
भिवंडी : तालुक्यातील पडघानजीकच्या खालिंग बुद्रुक गावात एका घराच्या पायरीवर पहाटे बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने गावात घबराट पसरली होती. बॉम्बशोधक पथकाने तातडीने धाव घेत, ती वस्तू ‘बॅटरी सोर्स’ असल्याचे स्पष्ट केल्यानंतर, ग्रामस्थांसह पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
खालिंग बुद्रुक येथील शांताराम पितांबरे यांना पहाटे चार वाजता घराच्या पायरीवर एक बॅटरी संच आढळून आला. ती बॉम्बसदृश दिसत असल्याने त्यांनी पंचायत समिती सदस्य गुरु नाथ जाधव यांना माहिती दिली. त्यांनी पडघा पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे हे फौजफाटा घेऊन खालिंग गावात दाखल झाले. त्यांनी या संशयास्पद वस्तूबाबत खातरजमा करण्यासाठी ठाणे बॉम्बशोधक पथकास पाचारण करून घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. घटनेचे गांभीर्य पाहता अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजीव पाटील, पोलीस उपअधीक्षक दिलीप गोडबोले हेसुध्दा घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी संशयास्पद वस्तू जवळच्या शेतात नेवून तिची पाहणी केली असता, ती बॅटरी सोर्स असल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी या गावात कुरियरद्वारे बाटली बॉम्ब पाठवला असता, त्यामध्ये एक महिला जखमी झाली होती. त्यामुळे या घटनेने पितांबरे यांच्या घराजवळ ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ती वस्तू बॉम्ब नसल्याचे समजल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
उद्देश तपासणार
च्ही बॉम्बसदृश वस्तू कोणी व कोणत्या उद्देशाने ठेवली याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पडघा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली आहे.