अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; परदेशातील नागरिकांची केली जात होती लूट
By पंकज पाटील | Updated: May 19, 2023 18:01 IST2023-05-19T18:00:22+5:302023-05-19T18:01:01+5:30
अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस पार्क या इमारतीत हे बोगस कॉल सेंटर सुरू होते.

अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; परदेशातील नागरिकांची केली जात होती लूट
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा ठाणे गुन्हे शाखेने धाड टाकत पर्दाफाश केला आहे. या धाडीत पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अंबरनाथ पश्चिमेच्या ग्लोब बिझनेस पार्क या इमारतीत हे बोगस कॉल सेंटर सुरू होते. या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या २३३ नंबरच्या युनिटमध्ये हे बोगस कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. या कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांना आपण एक्सफिनिटी कंपनीतून बोलत असल्याचे सांगत त्यांना इंटरनेट सेवा ऑफर, तसेच बक्षीसांची आमिशे दाखवली जायची. त्यानंतर त्यांच्या डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स मिळवून त्यांच्या बँक खात्यातून पैसे परस्पर काढले जायचे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेला माहिती मिळताच त्यांनी या कॉल सेंटरवर धाड टाकली.
या ठिकाणी परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या ॲलेक्स डेव्हिड बासरी, मिल्टन मेल्विन मंतेरो, श्रीकांत जयप्रकाश पवार, आकाश विनोद ठाकूर आणि पंकज रतनसिंह गौड या पाच जणांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्यावर फसवणुकीसह कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यासह इंडियन टेलिग्राफ ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून त्यांचा ताबा सध्या गुन्हे शाखेकडेच आहे. त्यांच्या या बोगस कॉल सेंटरमधून किती लोकांची फसवणूक करण्यात आली आहे, तसेच त्यांनी लाटलेली रक्कम नेमकी किती आहे? या सगळ्या बाबी आता गुन्हे शाखेच्या तपासात समोर येणार आहेत.