जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला भिवंडीत काळे झेंडे
By Admin | Updated: November 10, 2016 03:03 IST2016-11-10T03:03:47+5:302016-11-10T03:03:47+5:30
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी महापालिका मुख्य कार्यालयात आलेले जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या गाडीला

जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीला भिवंडीत काळे झेंडे
भिवंडी : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी महापालिका मुख्य कार्यालयात आलेले जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या गाडीला महापालिकेच्या आंदोलनकर्त्या कामगारांनी काळे झेंडे दाखवत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
मासिक वेतन, बकरी ईदचा भत्ता व सानुग्रह अनुदानासह इतर मागण्यांसाठी महापालिका कामगारांनी १२ दिवसांपासून कामगार-कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मात्र, मार्ग काढण्यासाठी महापालिका आयुक्त व नगरसेवक तयार नसल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. बुधवारी स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होती. या वेळी महापालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांनी आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. या निवडणुकीच्या वेळी महापौर तुषार चौधरी व आयुक्त डॉ. योगेश म्हसे गैरहजर होते. जिल्हाधिकारी स्थायी समिती सभेच्या वेळेपेक्षा दोन तास उशिरा आले. त्या वेळी कामगारांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक संपल्यानंतर कामगार संघटनेच्या शिष्टमंडळास स्थायी समिती सभागृहात बोलवले. तेव्हा कामगारांचे प्रतिनिधी डॉ. किरण चन्ने यांनी महापालिकेतील भ्रष्ट कारभाराचा पाढा वाचला. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी महापौरांना तेथे बोलवून घेतले. तसेच कामगारांच्या समस्येबाबत लेखी निवेदन मागितले.