इंधन दरवाढीविरोधात पाळला काळा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST2021-06-29T04:26:49+5:302021-06-29T04:26:49+5:30
ठाणे : सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस ...

इंधन दरवाढीविरोधात पाळला काळा दिवस
ठाणे : सातत्याने वाढणारे पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेस यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे जिल्ह्यातील ३६ हजार वाहतूकदार चालक, मालकांनी आपापल्या वाहनावर काळे झेेंडे लावून व दंडावर काळी फीत बांधून, काळा दिवस पाळून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. येत्या ३१ दिवसात भाववाढ आटोक्यात आली नाही, तर ऑगस्टमध्ये चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
देशात कोरोनामुळे जे काही आर्थिक संकट ओढावले आहे, त्यामध्ये वाहतूकदारांचे कंबरडेच मोडले आहे. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारच्या वाहतूक व्यवसायातील जाचक अटी व सतत होणारी इंधन दरवाढ, विम्याची दरवाढ, वाहनावरील घेतलेले कर्जाचे हप्ते भरले नाहीत, म्हणून दुप्पट व्याजासह बँकेच्या खासगी वसुली एजन्सीकडून होणारा जाचक त्रास... या सर्व गोष्टींमुळे वाहतूकदार संपण्याच्या मार्गावर आहे. केंद्र, राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काळा दिवस पाळला.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसला ट्रक टेम्पो संघटना, लॉरी असोसिएशन, महाराष्ट्र आरटीओ प्रतिनिधी संघासह ३६ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना इमेलद्वारे निवेदन दिले आहे. मागण्यांसंदर्भात ३१ दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील ३६ हजार आणि देशभरातील ९६ हजार वाहतूकदार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष भटेसिंग राजपूत यांनी दिला आहे.